मुंबई : अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी ८१ लाख १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या वर्षासाठी राज्यातील एकूण १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले होते, तर त्यातील १ लाख २ हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरत प्रवेश अर्ज निश्चित केला होता.यंदा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी राज्यात १ लाख ३८ हजार ७४१ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी मंगळवारी तंत्रशिक्षण संचलनालयाने प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. मुळात ही यादी सोमवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव यादी उशिरा लागल्याचे कळते. या आधी प्रवेशासाठी शासनाने सुरू केलेल्या मार्गदर्शन केंद्रावर १ लाख १५ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी केवळ १ लाख ९ हजार ०२३ अर्ज तीन कॅप राउंडसाठी पात्र ठरले. मात्र, पहिल्या प्रवेशफेरीसाठी १ लाख २ हजार विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्ज भरला होता.संचलनालयाने केलेल्या आवाहनानुसार, पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित झाली आहेत, त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करताना प्रत्येक विद्यार्थ्याला मूळ गुणपत्रिका लागणार आहे. शिवाय प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने फ्रीज, स्लाइड, फ्लोट यांपैकी पर्याय निवडायचा आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी ७ जुलैला जाहीर होईल. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार असून, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला दिलेल्या यादीच्या आधारावर पहिल्या तीन फेऱ्या पार पडतील, तर चौथ्या फेरीसाठी नव्याने विकल्प देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकीचे ८१ हजार प्रवेश निश्चित
By admin | Published: June 29, 2016 1:49 AM