मुंबई : कोरोना संकटाशी जग लढत आहे. साथीचा रोग दीर्घकाळ चालेल, पण जनजीवन आणि आर्थिक घडी नीट व सुरळीत बसवायची आहे. उद्योजकांना भरपूर संधी आहेत. गरज आहे ती त्यांनी चिकाटीने प्रयत्न करण्याची. संकटावर मात करून सर्व उद्योजकांचा मार्ग सुकर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांगून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योगजगतात विश्वास जागवला.कोरोनाशी सर्व जग लढत आहे. भारतासह महाराष्टÑही त्याला अपवाद नाही. संकट मोठे आहे. मात्र त्यावर मात करून अर्थव्यवस्थाही बळकट करणे ही काळाची गरज आहे. ती कशाप्रकारे बळकट करता येईल, यावर ‘पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी अंतर्गत’ शुक्रवारी लोकमतने आयोजित केलेल्या विशेष वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी उद्योगजगतातील अनेक मान्यवरांनीही आपले विचार मांडले.साथीचा रोग दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला जनजीवन आणि आर्थिक घडी नीट व सुरळीत बसवायची आहे. त्यासाठी उद्योजकांना भरपूर संधी आहेत, असे देसाई यांनी यावेळी सांगितले.पंतप्रधानांच्या २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा तपशील वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. विनातारण कर्ज योजना चांगली आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे हप्ते सरकार फेडणार आहे. सेवा उद्योगाला उत्पादन उद्योगाशी जोडले आहे. धोरणात्मक बदल दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत उद्योजकांना पर्याय शोधण्याचे आणि चिकाटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांच्याच प्रयत्नाने महाराष्ट्राला शिखरावर नेणार आहे. महाराष्ट्रात शेतीला आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतात काय पेरले पाहिजे, बायबॅक पद्धत तसेच इतर देशांसोबत लिंकेज कसे तयार करता येतील, ते आम्ही पाहू. बँकांचे व्याजदर कमी कसे होतील, याकरिता प्रयत्न सुरू आहेत. विशेष योजना राबविण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. व्यापार विभाग आणि ई-कॉमर्सला एमएसएमईप्रमाणे दर्जा देण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.रोजगार निर्मिती आणि राज्याला आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोविडने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने गोरेगाव येथे दोन हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल शनिवारी सुरू केले. संकटावर मात करून सर्व उद्योजकांचा मार्ग सुकर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.उत्पादनांच्या निर्यातीसाठी पुढाकार घ्यावाअर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी निर्यातीची फार मोठी भूमिका असते. विदेशाच्या तुलनेत भारतात निर्यातीला शासनाकडून हवे तसे प्रोत्साहन मिळत नसून, त्याकरिता पुढाकार घेण्याची गरज आहे. कोविड-१९ चा परिणाम जगभरात झाला आहे. कोणतेही उद्योग आकस्मिकपणे उद्भवलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार नसतात. कोविड-१९ हा उद्योगांसाठी धडा आहे. लॉकडाउन लागू केले तेव्हा कारखान्यात कच्चा आणि फिनिश माल पडून होता. त्याची उद्योजकांना चिंता आहे. चीनमधील उद्योग महाराष्ट्रात सुरू व्हावेत, याकरिता शासनाने अधिकाऱ्यांचे कृती दल स्थापन केले आहे. ही चांगली बाब आहे. गुजरातचे कृती दल विदेशातील उद्योजकांसाठी चर्चा करीत आहे. महाराष्ट्रानेही आपले दल सर्वत्र पाठवावेत. महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम उद्योगांकडे सुविधा आहेत. त्याचा उपयोग त्यांनी करावा. कंत्राटी उत्पादकांसाठी काय करू शकतो, याचाही शासनाने विचार करावा. हायटेक इंडस्ट्रियल पार्क उभारण्यासाठी जपानची इच्छा आहे. महापरवाना (एक खिडकी योजना) देश-विदेशातील कंपन्यांसह स्थानिक उद्योजकांसाठीही असावा. कर्ज तारणविरहित असले तरीही या काळात नवउद्योजक पुढे येणार नाहीत, अशी भीती वाटते. उद्योजकांना बँका कर्ज देत आहे वा नाही, याची शासनाने दखल घ्यावी. आजारी उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात ३० हजार उद्योग सुरू झालेत, ही चांगली बाब आहे. मोठे उद्योग जगवा, तरच लघु व मध्यम उद्योग जगतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचविले होते. त्याचे त्यांनी स्वागत केले होते. लोकल उत्पादने ग्लोबल पोहोचावीत. लघु उद्योग सक्षम व्हावेत, हीच अपेक्षा.- चंद्रकांत साळुंखे,संस्थापक अध्यक्ष, एसएमई चेंबर आॅफ इंडिया.शेतमालावरील प्रक्रिया उद्योग उभे व्हावेतभारताच्या शाश्वत आणि आर्थिक विकासासाठी देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू व्हावेत. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल. याकरिता राज्य शासनाने पुढाकार घ्यावा आणि विशेष सकारात्मक योजना राबवणे गरजेचे आहे. यासाठी शासनाला स्वतंत्र सेल स्थापन करावा लागेल. सातारा येथे फूड पार्क सक्षमपणे उभा राहिला आहे. तिथे आल्याचे (अद्रक) उत्पादन झाले आहे; पण भाव ३० ते ४० रुपये आहे. रशियात आल्याला मागणी आहे. भावही जास्त आहे. त्यामुळे तेथील आयातदारांचा शोध घेण्यात येत आहे. अशा प्रकारे अन्य देशातही भारतीय कृषी उत्पादनांची मागणी वाढली पाहिजे. याकरिता आयातदारांचा शोध घ्यावा लागेल. अर्थव्यवस्था सक्षम करणाºया या उद्योगाला शासनातर्फे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आता एक लाख एकर सिंचनयुक्त जागा उपलब्ध आहे. विषमुक्त उत्पादने आणि प्रोसेसिंग आम्ही करून देऊ. आता चीनकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. अनेक जण चीनबाहेर उद्योग स्थापन करण्यास इच्छुक आहेत. या संधीचे सोने आम्हाला करायचे आहे. भारतात उद्योजक मोठ्या प्रमाणात येतील. भारतीय उद्योजक आणि भारताबाहेरील उद्योजकांना काय हवे ते त्यांना देऊ. कंपन्यांना जागा आणि कामगार उपलब्ध करून देणार आहे.- हनुमंत गायकवाड, चेअरमन,बीव्हीजी इंडिया.भारतीय उत्पादने निर्यात व्हावीतकोरोनाने भारतीयांना बरेच काही शिकविले आहे. शासन आणि लोकांकडून सामाजिक अंतराचा वापर वाढला आहे. उद्योजकांना नवीन संधी उपलब्ध झाल्याने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यावा. भारतीय उत्पादने निर्यात करण्याचा उद्योजकांचा प्रयत्न असायला हवा. त्यामुळे चलन भारतातच राहील. देशात आयुर्वेदाचा वारसा पुढे गेला पाहिजे. नागपुरी संत्री असो किंवा कोकणचा आंबा, यापासून उत्पादने बनविणे महत्त्वाचे आहे. भारतात बँकेच्या व्याजाचे दर जास्त आहेत. त्यानंतरही लोक कर्जासाठी बँकेच्या मागे लागतात. लोकांनी उद्योग सुरू करण्यासाठी ओळखीच्या किंवा उद्योगाच्या साखळीतील लोकांकडून कर्ज घ्यावे. गुंतवणूक कुणीही करू शकतो. भारतात ही संधी आहे. याचे उदाहरण म्हणजे उद्योजक मुकेश अंबानी यांनी जिओ कंपनीतील १० टक्के समभाग फेसबुकला देऊन ४५ हजार कोटी रुपये उभे केले आहेत. विकोचा ४५ वर्षांपासून संचालक आहे. कंपनी आजोबांनी १९५२ मध्ये उभी केली. ग्राहकोपयोगी सुरक्षित उत्पादने निर्मितीत विकोचा हातखंडा आहे. कॉस्मेटिक आणि टूथपेस्ट प्रचलित आहे. आयुर्वेदिक उत्पादनांच्या करासंदर्भात शासनाचे स्पष्ट धोरण असायला हवे. आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये सुस्पष्टता असावी. उत्पादनांसाठी कॉस्मेटिक, एफडीए आणि मेडिसीन परवाने घ्यावे लागतात. कराचा भार वाढल्यास उत्पादने महाग होतात. ती परवडणारी असावी. शासनाने ग्रीन झोनमध्ये उद्योगांना परवानगी द्यावी. कोरोना संकट अपेक्षित नव्हते. राज्य शासनातर्फे चांगल्याउपाययोजना करून या संकटावर मात केलीआहे.- संजीव पेंढारकर, संचालक, विको लेबोरेटरिज.
आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी उद्योजकांनी चिकाटीने प्रयत्न करावेत, सुभाष देसाई यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 6:15 AM