नागपूर : देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते. अभियंत्यांनी ‘पॅकेज’च्या मागे धावण्यापेक्षा उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच सशक्त भारताचे निर्माण होईल, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. मंगळवारी ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेम रमेश औटी याचा सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मान करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव मंचावर उपस्थित होते.शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास करणे शक्य आहे. देशातील समस्यांचे त्याद्वारे निराकरण होऊ शकते, असे राष्ट्रपती म्हणाले. जागतिक क्रमवारीत बंगळुरू येथील ‘आयआयएससी’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स) १४७ तर ‘आयआयटी-दिल्ली’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १७९ वा क्रमांक आहे. ‘आयआयटी-मुंबई’चा २०२ वा क्रमांक असल्याचे सांगत शिक्षणसंस्थांनी दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुखर्जी यांनी केले. देशात बुद्धिमत्ते कमतरता नाही, तिचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास राष्ट्र प्रगतीचे शिखर गाठेल. संशोधनातूनच देशातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मौलिक मदत होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे आणि देशातील तांत्रिक क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी नवे संशोधन व मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग व्हायला हवा, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)
उद्योजकतेतून घडवा सशक्त भारत-प्रणव मुखर्जी
By admin | Published: September 16, 2015 2:12 AM