पुणे : ‘विकिपीडिया’ म्हणजे जगभरातील माहितीचा खुला खजिना. कुठलीही माहिती एका क्लिकवर सहजपणे घरबसल्या मिळणारं हे माध्यम. इंग्रजी ही ज्ञानव्यवहाराची भाषा असल्याने तत्काळ कुठलीही माहिती या भाषेत मिळू शकते; पण मातृभाषेत ती मिळण्यासाठी काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. याच जाणिवेतून विकिपीडियावर मराठी भाषेतील नोंदीची संख्या वाढावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. मराठीचे ज्ञान असणाऱ्या विविध अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी या नोंदी विकिपीडियावर कराव्यात, या उद्देशाने राज्यभरात कार्यशाळा घेण्याचा उपक्रम संस्थेतर्फे राबविला जात आहे.इंटरनेटच्या महाजालामुळे बहुतांशी सर्व ज्ञानव्यवहार हे इंग्रजी भाषेमधून होत आहे. मात्र, हे प्रमाण मराठीमध्ये खूपच कमी आहे. आजमितीला विकिपीडियावर मराठीची केवळ ४५ हजार पाने आहेत. विकिपीडियावरील माहितीच्या सत्यतेची शंभर टक्के खात्री देता येत नसली, तरी मराठीमधील नोंदी जास्तीत जास्त वाढल्या, तर त्याची अचूकता निश्चितच वाढणार आहे. यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नगर, कोल्हापूर, सांगली, जळगाव, औरंगाबाद, राहुरी या ठिकाणी कार्यशाळा झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
विकिपीडियावर मराठीतही नोंदी
By admin | Published: January 25, 2017 2:23 AM