पुणे : दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व मध्य-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पुढील ४८ तासात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तो केरळात ४ ते ५ दिवसांत दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने गुरूवारी वर्तविला आहे.हवामान विभागाने यंदा मान्सून केरळमध्ये ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे़ राज्यात गेल्या २४ तासात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सांगोला तसेच कोकणातील देवगड, मालवण आणि विदर्भातील राजुरा येथे दमदार पाऊस झाला. गोव्यातील दाभोलीम, मुरगाव,पेडणे, सांगे या भागातही दमदार सरी कोसळल्या. (प्रतिनिधी)
मान्सूनसाठी वातावरण अनुकूल
By admin | Published: June 03, 2016 3:25 AM