सांगली: तब्बल ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे सरसावले आहेत. वटवृक्ष कापला जाऊ नये, यासाठी ठाकरेंनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ साठी वटवृक्ष तोडावा लागणार आहे. मात्र याला स्थानिकांकडून वाढता विरोध सुरू आहे. वटवृक्ष वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी चिपको आंदोलनदेखील सुरू केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी गडकरींना पत्र लिहून वटवृक्ष न कापता पर्यायी जागेवरून रस्त्याचं काम करण्याचं विनंती केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातो. गावातील गट क्रमांक ४३६ इथं यलम्मा देवीचं मंदिर असून त्यासमोर ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा असून तो वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षांसाठी नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे, असं आदित्य यांनी गडकरींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. वटवृक्षाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संबंधित जागेवरील महामार्गाचं संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचं जतन करण्याची विनंती आदित्य यांनी केली आहे.
गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:09 PM