पालघर/नंडोरे : नंडोरे येथील एका छोट्या औद्योगिक वसाहतीतील व त्या बाजूस असलेल्या कारखान्यातून निघणारे टाकाऊ प्लास्टिक व कचरा राजरोसपणे समोरून जाणार्या रस्त्याच्याकडेला पेटवून प्रदूषण केले जात असल्याचे लोकमतच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले आहे.नंडोरे येथे जवळच असलेल्या या औद्योगिक वसाहतीतील ओसाका रबर प्रायव्हेट लिमिटेड ही रबर उद्योग कंपनी आपले टाकाऊ प्लास्टिक व कचरा कंपनीच्या समोरील रस्त्याच्या कडेला पेटवून नष्ट करीत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राखीचे ढिगारे निर्माण झाले असून प्रसंगी त्यामुळे आगही लागू शकते, अशा घातक कृत्यामुळे प्रदूषण होत असून पर्यावरणास हानी पोचत आहे. हा कचरा पेटवल्यामुळे त्यातून निघणारी राख आजूबाजूच्या कुरणातील गवतावर जाऊन बसते परिणामी येथील परिसरात चरण्यासाठी येणाऱ्या दुभत्या जनावरांना तसेच रस्त्यावरून येत जात असलेले नोकरवर्ग यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी या कंपनीने येथे हा कचरा पेटवू नये अशी मागणी होत आहे.या कंपनीच्या बाहेरील नंडोरे मुख्य रस्त्याकडे निघत असताना शिवम उद्योगच्या बाजूकडील भिंतीकडेही अशाच प्रकारचा कचरा जाळला जातो आहे. >प्रदूषण थांबणार कधी?प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तसूभरही धाक जाणवत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. रहिवाशांसाठी जीवघेणे ठरणारे हे प्रदूषण प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रणमंडळ थांबविणार तरी कधी, असा प्रश्न जनता विचारते आहे.
दोन कारखान्यांकडून पर्यावरणाची हानी
By admin | Published: October 31, 2016 3:34 AM