- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि.26 - सुमारे १८० किलोचे इफेड्रीन सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीतून बाहेर काढल्यानंतर ओसिएन शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचा संचालक असिकन्नन याने त्याची परदेशात तस्करी करण्यासाठी १२५ किलो इफे ड्रीन अमोबी ओसीटा ऊर्फ सॅम (३४, रा. खारघर, नवी मुंबई) या नायजेरियनला दिले. सॅमने अनेकदा केनियात त्याची तस्करी केली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती काढण्यासाठी ठाणे पोलीस आता दुभाषाची मदत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पोलिसांना चकवा देणारा असिकन्नन याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने ज्या नायजेरियनकडे इफेड्रीन दिले, त्याची माहितीअमली पदार्थविरोधी पथकाला दिली. त्याच आधारे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल वालझडे, धर्मराज बांगर, विजय उफाळे, विठ्ठल करंजुले, हवालदार दिलीप सोनवणे, काळुराम शिरोसे, अनुप राक्षे, दीपेश किणी आणि हेमंत महाडिक आदींच्या पथकाने त्याला कळंबोली भागातून अटक केली. नवी मुंबईतील कोणत्या भागात या नायजेरियनकडे इफेड्रीन सोपवले, त्याची खातरजमा करण्यासाठी हे पथक कळंबोलीत पोहोचले. त्यावेळी योगायोगाने सॅमही तिथे आला. त्याने स्मितहास्य केल्यावर साध्या वेशातील या पथकाने त्याला अटक केली. सॅम आता इफेड्रीन प्रकरणात अटक झालेला १२ वा आरोपी असून तो यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. तो इंग्रजी आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक भाषा जाणतो. त्यामुळे त्याच्याशी संवादात बऱ्याच अडचणी येत आहेत. नायजेरियनच्या समस्या घेऊन येणाऱ्या काही सामाजिक संस्था किंवा काही प्रतिष्ठित नायजेरियनच्या मदतीने आता त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे अशाच एखाद्या चांगल्या नायजेरियनचाही शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केनियात इफे ड्रीनला परवानगीकेनियात इफे ड्रीनचा मादक पदार्थांमध्ये समावेश नसल्यामुळे सॅम औषधाच्या नावाखाली असिकन्ननने दिलेले इफे ड्रीन सहज घेऊन जायचा. त्याने मार्च आणि एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यात पाच फेऱ्या करून १२५ किलो इफे ड्रीन केनियात नेले. २०१३ पासून व्यवसायानिमित्त सॅम भारतात आला असून तेव्हापासून त्याने हेच काम केले. सुशीलकुमार आणि हरदीप यांच्याकडून जो माल मिळायचा, त्याचीच दिल्लीमार्गे केनियात तस्करी केल्याचेही त्याने सांगितले. आता सॅमने आणखी कोणत्या ठिकाणी इफे ड्रीन दडवले किंवा तस्करी केली, याची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुशीलच्या गाडीतून तस्करीओसिएन शिपिंग कॉर्पोरेशनचा व्यवस्थापक हरदीप गिल हा सुशीलकडून इफेड्रीनची तस्करी करण्यासाठी त्याला एका फेरीसाठी २० हजार रुपये द्यायचा. सुशील हा आपल्या रेवा कारमधून सोलापूर ते गुजरात तसेच इतर ठिकाणी हे इफे ड्रीन नेण्याचे काम करीत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. ...................