लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात बुधवारी सायंकाळी ५.२८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर भूकंप झाल्याची नोंद असल्याने अकोल्यात भूकंप झाल्याची अफवा पसरली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले; परंतु नंतर सत्य समोर आल्यामुळे अकोलेकरांचा जीव भांड्यात पडला.अकोल्यापासून दक्षिणेस १२९ किलोमीटर अंतरावर बुधवार, २३ जून रोजी सायंकाळी ५. २८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ नोंदविली गेली.या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली व वसमतदरम्यान भूगर्भात ५ किमी खोलीवर असल्याची नोंद घेण्यात आली आहे. १९.५४ अक्षांश, ७७.१० रेखांशावर धक्के जाणविल्याची नोंद भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’च्या संकेतस्थळावर घेण्यात आली आहे. या संकेतस्थळावर अकोल्याचा उल्लेख असल्याने सोशल मीडियावर अकोल्यातच भूकंप झाल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. जिल्ह्यात ३.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जाणवल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अकोला येथील हवामान विभागाचे प्रभारी अधिकारी जालिंदर साबळे यांनीही या संदर्भात दुजोरा दिला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाने वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील १५ गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याचे जाहीर केले आहे. या गावांमध्ये कोणतीही जीवीत अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात; अकोल्याच्या संदर्भामुळे अफवांचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 9:48 AM
अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर भूकंप झाल्याची नोंद असल्याने अकोल्यात भूकंप झाल्याची अफवा पसरली होती.
ठळक मुद्देहिंगोली व वसमतदरम्यान भूगर्भात ५ किमी खोलीवर असल्याची नोंद घेण्यात आली आहे.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ नोंदविली गेली.हवामान विभागाचे प्रभारी अधिकारी जालिंदर साबळे यांनीही या संदर्भात दुजोरा दिला आहे.