पारनेर (जि. अहमदनगर) : ‘पोलीस मोबाइलमध्ये व्यस्त असतात,’ असे सांगत अण्णा हजारे यांनी त्यांना पुरविलेल्या संरक्षण यंत्रणेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी कबूल करीत दिलगिरी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठविले आहे. अण्णा हजारे यांनी संरक्षण काढून घेण्याची विनंती करणारे पत्र दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते़ त्यानंतर बुधवारी सायंकाळी राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्णप्रकाश यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर रात्रीच मुख्यमंत्र्यांचे पत्र अण्णांना मिळाले. पोलीस सुरक्षा व्यवस्थेतील उणिवांची दखल घेतल्याचे नमूद करीत मुख्यमंत्र्यांनी अण्णांची माफी मागितली़ या पत्रात म्हटले आहे की, आपल्या संरक्षणाबाबत पोलीस दक्ष असावेत, आपल्या दौऱ्यात वाहन व अंगरक्षक कायम सोबत असणार आहे. बेशिस्त पोलीस व अधिकारी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तुम्हाला परिपूर्ण संरक्षण व्यवस्था पुरविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, जनसामान्यांकरिता आपले जीवन बहुमूल्य आहे. समाजकंंटकापासून जीविताला धोका होण्याची शक्यता असल्याने आपल्याला संरक्षण पुरविण्यात आले आहे. तुमचे संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य असल्याने आपण सुरक्षा मागे घेण्याची विनंती करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अण्णांना पत्रात केली आहे. (प्रतिनिधी)
अण्णांच्या सुरक्षेत त्रुटी - मुख्यमंत्री
By admin | Published: March 11, 2016 4:19 AM