लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : विश्रांतवाडी चौकात स्कायवॉक लिफ्ट मध्येच बंद पडल्याने वडील आणि मुलगा दोन तास लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. विश्रांतवाडी चौकातील स्कायवॉकच्या लिफ्टमधून जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडल्याने बुधवारी रात्री श्रीकांत ढगे (वय ३२ वर्षे, रा. प्रतीकनगर, पुणे) हे त्यांच्या ३ वर्षांचा मुलगा वेदांत याच्यासह अडकले. त्यांनी मदतीसाठी आवाज द्यायचा प्रयत्न केला. पण लिफ्टच्या बाहेर आवाज जात नसल्याने ते अडकल्याचे बराच वेळ कोणाला काहीच समजले नाही. लिफ्टमधे कोणीही सुरक्षारक्षक नव्हता. तेथे असलेला फोनही लागत नव्हता. आतमधे हवाही येत नसल्याने ढगे व त्यांचा मुलगा खूप घाबरले होते. सुदैवाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचे लक्ष गेल्याने लिफ्टच्या आतून कोणीतरी हात हलवताना दिसल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले व जवळील दोन-तीन माणसांना सांगितले. त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. विशाल सोनावणे, संजय रासकर, संतोष वाघमारे, विकी मिश्रा, पराग चव्हाण, गौरव कांबळे, फैयाज शेख, प्रशांत गायकवाड, प्रवीण कांबळे, अण्णा भालेराव, प्रकाश बरकडे अन्य काही लोकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. नंतर सहायक पोलीस फौजदार सुरेश बढे मदतीला आले व त्यांनी अडकलेल्या बाप-लेकांना हवा मिळावी म्हणून एका बाजूची लिफ्टची काच फोडली. येरवडा विभागाच्या अग्निशामक दलाला फोन करून बोलवण्यात आले. अग्निशामकचे जवान सुनील धुमाळ, ज्योतीबा शिंदे, विष्णू जाधव, रघुनाथ खांडरे यांनी दरवाजा तोडून ढगे व त्यांच्या मुलाची सुटका केली.
स्कायवॉक लिफ्टमधून सुटका
By admin | Published: June 09, 2017 12:52 AM