डिप्पी वांकाणी, मुंबईअण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या बँक खात्यातून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम याच्या सांगण्यावरून काढण्यात आलेल्या १४८ कोटी रुपयांचा शोध घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तुकड्या स्थापन केल्या आहेत. या तुकड्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत हा शोध घेतील.सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाच्या नावाने प्रचंड रक्कम मोजून औरंगाबादेत घेण्यात आलेल्या दोन एकर जागेपैकी दोन तृतीयांश जागेची नोंदणी कदमने अगदी थोडी रक्कम देऊन स्वत:च्या नावाने करून घेतली होती. ही जागा ईडी जप्त करणार आहे. कदमने ३२१.२६ कोटी रुपयांच्या जमविलेल्या मालमत्तेपैकी ईडीने ३१ मार्च रोजी १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता जप्त केली होती.‘‘वेगवेगळ्या जिल्ह्यांत असलेल्या महामंडळाच्या बँक खात्यांतून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कदमच्या सांगण्यावरून १४८ कोटी रुपये काढले होते. राज्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (सीआयडी) हे पैसे निवडणुकीच्या उद्देशाने काढले व वापरले याचे पुरावे गोळा केले आहेत. आता आम्ही या पैशांचा माग काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहोत. पदाधिकाऱ्यांचे व ज्या लोकांकडे इतर सदस्यांनी पैसे हवाली केले त्यांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत. हे पैसे खर्च झालेले असल्यामुळे ते परत मिळविणे अवघड आहे. आम्ही गुन्ह्यातील पैसा सिद्ध करू,’’ असे ईडीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
१४८ कोटींच्या शोधासाठी ईडीच्या तुकड्या स्थापन
By admin | Published: April 07, 2016 2:43 AM