मुंबई - बाळासाहेबांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. मात्र आता, या प्रतिष्ठानच्या स्विमिंग पुल आणि बॅटमिंटन कोर्टच्या 'खासगीकरणाचा' घाट घातला जात आहे. यासंदर्भात विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी आणि हे खासगीकरण त्वरित थांबवावे, अन्यथा आम्ही प्रतिष्ठानचे १००० कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे. (The establishment established by Balasaheb is being made the center of corruption MLA Nitesh ranes letter to the CM)
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणे म्हणाले, शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सामान्य मराठी माणूस होता. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती व त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखली होती. ही मुंबई फक्त धन दांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकरांनाही खेळ मैदानं, जलतरण तलाव, उद्यानं पाहायला मिळावीत, त्याचा लाभ घेता यावा, तिथं आपली कौशल्य विकसीत करता यावीत यासाठी त्यांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच भ्रष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय! असा संताप सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
"हिंदु खतरे में है! बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांच्याच मुलानं संपवलं, अन्...”
या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी, म्हणून यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे बाळासाहेबांना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली. यात सदस्य म्हणून कला व क्रिडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबांचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु आता मात्र तसे राहिले नाही. या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्र कुमार जैन नियुक्त झाल्या-झाल्याच स्विमिंग पुल आणि बॅटमिंटन कोर्ट यांच्या 'खासगीकरणाचा' घाट घातला जातोय. यातली विशेष महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, की हे या महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही. जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅटमिंटन कोर्ट 'विकायला' निघाले आहेत? आणि ते कुणाच्या घशात घालायचे आहेत? हेही अगोदरच ठरले असल्याच्या गरम वार्ता क्रिडा वर्तुळात चांगल्याच फिरतायत. म्हणजे अभिरूची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे. एकदा याचं खासगी करण झालं की यात काम करणाऱ्या १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना उद्धवस्त केले जाणार हे स्पष्ट आहे , त्यातील नीम्मे हे बाळासाहेबचे सैनिक आहेत, असे नितेश यांनी म्हटले आहे.
मुळात, या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो. तरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते. आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आहे. यामुळे नफ्यात चालणाऱ्या तरण तलावाचे खासगीकरणच कशासाठी? व कुणासाठी? हे जलतरण तलावाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय? हा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रकाराची आपण विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर व त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी व हे खासगीकरण थांबवावे, अन्यथा आम्ही प्रतिष्ठानचे १००० कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.