चौका (जि. औरंगाबाद) : हिंसा, जातीयवाद, अंधश्रद्धा यापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी व देव नाही या बाबीला रुजविण्यासाठी ‘भारतीय बुद्धिस्ट संघा’ची स्थापना करण्यात आली असून, खऱ्या अर्थाने भारताला महासत्ता बनवायचे असेल तर अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता याबरोबरच बुद्धांच्या शिकवणुकीची गरज असल्याचे संघाचे अध्यक्ष अॅड. पी.आर. ढाले यांनी सांगितले.सर्व समाजाला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व बुद्धांची शिकवण सर्वांना देण्याकरिता भारतीय बुद्धिस्ट संघ महाराष्ट्रभर प्रसार करीत असून, पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत संघाचे २ लाख ५० हजार सभासद झाले असल्याचेही ढाले म्हणाले. भारतीय बुद्धिस्ट संघाचे उद्घाटन शनिवार, दि. ११ एप्रिल २०१५ रोजी म्हणजेच महात्मा जोतिबा फुले जयंतीदिनी होणार असून, १० हजार सभासद उपस्थित राहतील. उद्घाटनास प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. सुषमा अंधारे उपस्थित राहणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या व्यक्तीही हजेरी लावणार आहेत. संघाने २४ तास हेल्पलाईन नं. ८८८८१२२२२८ सुरू केला आहे. या नंबरवर संपर्क साधून सभासदही होता येईल. संघात अधिकारी, कर्मचारी, अभियंते, वकील, बँक कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकांसह कोणालाही सहभागी होता येईल, असेही ते म्हणाले. संघातर्फे महाराष्ट्रभर बुद्धिस्ट सभागृह उभारले जात असून, प्रत्येक तालुक्याच्या मतदार यादीतून जिल्हा प्रतिनिधी, तीन जिल्ह्णांतून एका विभागाचा प्रतिनिधी असे १२ विभागीय प्रतिनिधी मार्गदर्शन करणार असून, बुद्धिस्ट सभागृहाची वर्षातून चार अधिवेशने होणार आहेत. तीन महिन्यांच्या खंडानंतर ती भरवली जाणार आहेत. पहिले अधिवेशन २ जून २०१५ रोजी चौका (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील मुख्यालयात होणार असल्याचे अॅड. ढाले यांनी सांगितले.
विज्ञाननिष्ठ, आधुनिक देशासाठी भारतीय बुद्धिस्ट संघाची स्थापना
By admin | Published: April 10, 2015 2:19 AM