राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:27 AM2019-08-28T06:27:55+5:302019-08-28T06:29:12+5:30
राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.
मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. तर या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह इतर काही जण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकांचे तत्कालीन संचालक, पेण सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी आणि अन्य लोकसेवकांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांसह कट रचून, संगनमताने फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करून वापर आदी कलमांनुसार एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तक्रारीत कोणाच्याही नावांचा उल्लेख नाही.
या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली. सक्तवसुली संचालनालयही (ईडी) या प्रकरणाची समांतर चौकशी करेल, अशीही माहिती मिळते. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेत झालेल्या बैठकीदरम्यान ईडीचे अधिकारीही उपस्थित होते.
शरद पवारांनाही एसआयटीसमोर
हजर राहावे लागणार?
ज्यांची नावे समोर येतील त्यांना चौकशीसाठी एसआयटीसमोर हजर राहावे लागेल. गरज पडल्यास शरद पवारांनाही एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.