मुंबई : बांधकामाची परवानगी देण्यासाठी तब्बल दीड लाखांची लाच घेत असताना पकडलेल्या मुंबई महापालिकेचा दुय्यम अभियंता बालाजी गुरुपडप्पा बिराजदारने पदाचा गैरवापर करून तब्बल ५६ लाखांची बेनामी मालमत्ता मिळविल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. स्वत:च्या व पत्नी रेखाच्या नावे त्याने कांदिवलीत फ्लॅट, लातूरमध्ये भूखंड व बॅँक खात्यावर त्याने ही संपत्ती जमविली होती. त्यामुळे या दाम्पत्यावर मिळकतीहून अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिराजदार हा महापालिकेच्या भायखळा ई वार्ड येथील इमारत प्रस्ताव शाखेत दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत होता. गेल्यावर्षी २१ आॅक्टोबरला एका नागरिकाकडून घराच्या बांधकामाला परवानगीसाठी सहकाऱ्यासमवेत दीड लाखांची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला पकडले होते. त्याच्या कांदिवलीतील घराची झडती घेतली असता लातूरमध्ये जमीन व विविध बॅँकांत स्वत:च्या व पत्नीच्या नावे जमीन असल्याचे आढळून आले होते. त्याने पदाचा गैरवापर करून तब्बल ५६ लाखांची संपत्ती जमविली होती़ ही मिळकत त्याच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल ९७.९५ टक्के अधिक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे बालाजी बिराजदार व त्याची पत्नी रेखा बिराजदारवर भादंवि कलम १३१ (१), (इ), सह १३ (२) भ्र.प.अधिनियम १९८८ सहकलम १०९ अन्वये शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
अभियंत्याकडे ५६ लाखांची बेनामी मालमत्ता आढळली
By admin | Published: August 03, 2015 1:26 AM