पुणे : मराठवाडा, खानदेशासह विविध ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने ९० लाख टन साखर उत्पादन होईल, असे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. या वर्षीच्या (२०१८-१९) हंगामातही ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन १०६ ते १०७ लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा उसाचे प्रमाण ६० टक्के असल्याने सरासरी ९० टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच यंदाच्या हंगामात ११.६२ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण २.६० लाख हेक्टरने अधिक आहे. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन वाढेल असा अंदाज आॅगस्ट महिन्यात सहकार मंत्र्यांनी वर्तविला होता. शेवटच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरविल्याने उसासह विविध पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याचा अंदाज आहे. याबाबत माहिती देताना वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने मराठवाडा, खानदेश, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. या भागात एकूण उसाच्या ४० टक्के क्षेत्र आहे. अत्यल्प पावसामुळे येथील उत्पादनात ४० टक्के घट होईल. त्यातच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकतेत १० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सरासरी १५ ते २० टक्के उत्पादनात घट होईल. त्यामुळे यंदा साडेसातशे ते आठशे लाख टन ऊस गाळपातून ९० ते ९२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल. ..........................देशात ३०० लाख टन साखर उत्पादित होणार?उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या २३८ या जातीवर रोग पडल्याने येथील साखर उत्पादन १२० लाख टन अंदाजापेक्षा ११० लाख टनापर्यंत खाली येईल. महाराष्ट्रातील उत्पादनातही घट होणार असल्याने देशात यंदा ३०० लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षी देशात ३२० लाख टन साखर उत्पादित झाली होती.
राज्यात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 1:28 PM
राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले.
ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : उत्पादनात १५ ते २० टनांनी होणार घटदेशात यंदा ३०० लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज