विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहक तयार असून, राज्यभरात एक ते दीड हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी २० ग्रॅम सोने खरेदी करण्याची शक्यता असल्याने सुवर्ण व्यावसायिकही ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी चांदीच्या भावात एकाच दिवशी तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाल्याने ती ५७ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. सोन्याच्या भावातही ६०० रुपयांनी वाढ होत ते ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचल्याने ग्राहकांना सोने खरेदीसाठी थाेडे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
कोणत्या दागिन्यांना सर्वाधिक पसंती?
सोन्यामध्ये मंगलपोत, डिझायनर सोन्याचे हार, कर्णफुले या सोबतच अस्सल सोन्यापासून तयार केलेल्या आपट्याच्या पानांना अधिक पसंती असल्याचे सांगण्यात आले. खरेदीचा उत्साह पाहता विजयादशमीला सोने म्हणून देण्यात येणाऱ्या आपट्याच्या पानांसोबतच अस्सल सोन्याचीही मोठ्या प्रमाणात जणू ‘लूट’च होणार असल्याचे चित्र आहे.
सोने-चांदीला का आला भाव?
जागतिक मंदीच्या भीतीने १ सप्टेंबरपर्यंत चांदीच्या किमती ५२ हजार २०० रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्या होत्या. सोनेही ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली घसरले. जागतिक बाजारातील अस्थिरता व वाढलेली गणी यामुळे सोने चांदीच्या दरात वाढ होत आहे.
नवरात्रोत्सवात सोने-चांदीला मोठी मागणी असून विजयादशमीमुळे ही मागणी अधिक वाढली. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मागणी वाढल्याने भाव वाढले. - सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"