युरोपमध्ये किंवा एकंदर विदेशात व्यंगचित्रकलेचं कल्चर रुजलेलं आहे असं राज म्हणाले. तिथं, चित्रकला हा विषय ऑप्शनला नसतो, असं सांगताना, लहानपणापासून मुलांवर कलेचे संस्कार होतात, त्यांची जडणघडण सौंदर्यदृष्टी निर्माण होत होते असं ते म्हणाले. लहानपणीच हे संस्कार झाले की मग पिढ्या फुकट जात नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
याचा दाखला देताना राज म्हणाले, की जंगल बुकचं उदाहरण घ्या. त्याच्यात एक मानवी कॅरॅक्टर सोडलं तर बाकी सगळी अॅनिमेशन्स आहेत. आणि या चित्रपटावर त्यांनी 1300 कोटी रुपये खर्च केला आहे. भारतात या पैशात स्टीलचा प्लँट होतो, अशी टिप्पणी त्यांनी केली.
त्यामुळे विदेशात व्यंगचित्रकला व एकंदरच कलाक्षेत्राची संस्कृती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक होते आणि अशा भव्य कलाकृती निर्माण होतात.
व्यंगचित्रकारांनी भूमिका घ्यायला हवी!
श्रेष्ठ व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचं उदाहरण देताना राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी असं मत व्यक्त केलं. लोकांना भूमिका घेणारी वर्तमानपत्र आवडतात, असा दाखला देताना, वृत्तपत्रांनीही भूमिका घेणाऱ्या व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन द्यायला हवं असं ते म्हणाले. डेव्हिड लो यांनी सातत्यानं हिटलर व मुसोलिनीविरोधी भूमिका घेतली. त्याचा परिणाम असा झाला की, हिटलर यांनी फर्मान काढलं की लो यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत, पण आणा. ही भूमिका घेणाऱ्या व्यंगचित्रकारांची ताकद असते असं ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांना काय वाटायचं याचं दडपण असायचं!
व्यंगचित्र काढताना काही तास संपूर्ण एकांत लागतो असं राज म्हणाले. त्यामुळे सकाळच्या सगळ्या भेटीगाठी बंद करून एकाग्रता साधल्यावरच चांगलं व्यंगचित्र काढता येतं आणि त्यासाठी तीन ते सहा तास लागतात असं त्यांनी सांगितलं. अर्थात, व्यंगचित्र काढताना नेहमी बाळासाहेब काय बोलतिल, वडील काय म्हणतिल हे दडपण सतत असल्याचं राज म्हणाले. एका शब्दाचे चार अर्थ निघू शकतात, परंतु चित्र थेट बोलतं, त्यामुळे ते खूप जपून करावं लागतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. व्यंगावर व्यंगचित्र काढायचं नाही अशी शिकवणही बाळासाहेबांची असून ती आपण कटाक्षानं पाळल्याचं राज म्हणाले.