अमरावती - भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही १ रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी येथे केले. या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. मंत्री कोकाटे जिल्हा कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यासाठी येथे आले होते.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, परराज्यांतूनही अर्ज केले
माध्यमांशी बोलताना कोकाटे म्हणाले, एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. भिकारीसुद्धा १ रुपया घेत नाही. आम्ही १ रुपयात पीक विमा देतो. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. अन्य राज्यांतील लोकांनी अर्ज केले. चौकशीनंतर चार लाख अर्ज रद्द करण्यात आले. कुठे तरी सीएससी केंद्रवाले असे उद्योग करत असावेत, असा संशय असल्याचे ते म्हणाले.
राजीनामा द्या...
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, शेतकरी अन्नदाता आहे. पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे पण भ्रष्टाचार होतच असतात, असेही कृषीमंत्री कोकाटे म्हणत आहेत. हे कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? पीकविमा भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले तर कृषिमंत्र्यांचा तिळपापड का होतो? उद्दाम कोकाटेंनी पायउतार व्हावे हा सत्तेचा माज कष्टकरी सहन करणार नाहीत, अशी टीका शरद पवार गटाने केली आहे.
१ रुपयात पीक विमा हे उपकार झाले का?
शेतकरी अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचा उल्लेख आदरानेच व्हायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी कृषिमंत्र्यांना दिला आहे तर सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते का? असा सवाल विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
एक रुपयामुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरले. एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू. वक्तव्याचा विपर्यास केला गेला. - माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री