खेड: निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही चुना लगाव आयोग असे म्हटले. भाजपला पूर्वी कुत्राही विचारत नव्हता, शिवसेनेच्या पाठिंब्याने वर आले, अशी टीका ठाकरेंनी केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'ज्यानी हिंदुत्वासाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या विरोधातच तुम्ही गेलात. भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता, शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली. ज्यांनी साथ दिली, त्यांनाच तुम्ही संपवलं. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. हे पळून गेलेली ढेकणं आहेत, त्यांना चिरडायला तोफेची गोळीबाराची गरज नाही.'
'भुरटे, चोर, गद्दार, शिवसेना नाव चोरू शकता पण शिवेसेना नाही'; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली
'ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगले आहेत, त्यांना चिरडण्याची ताकत एका बोटात आहे. शिवसेना आमची आई आहे. ज्यांना आपलं कुटुंब मानलं, त्यांनीच आपल्या आईवरती वार केलाय. आम्ही म्हणजे शिवसेना, असा तुम्हाला गर्व असेल, तर शिवसेना नाव बाजुला काढा आणि तुमच्या आई-वडिलांचे नाव लावून पक्ष बांधून दाखवा,' असे थेट आव्हानच ठाकरेंनी यावेळी दिले.
ठाकरे पुढे म्हणतात, 'नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं. ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं नाही, तेदेखील आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत आहेत. हे गद्दार तिकडे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर गेले. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. एक काळी टोपीवाला होता, गेला. त्यांनी शिवाजी महाराजांचा ,सावित्रीबाईंचा अपमान केला. दिल्लीसमोर झुकण्याचे विचार बाळासाहेबांचे नाहीत,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.