पुणे : जून महिन्यात वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनने गेल्या चार दिवसांत कोकण, मुंबईला अक्षरश: झोपडून काढले असले, तरी राज्याच्या अन्य भागांत अजूनही पावसाची मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा आहे़ कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, जालना, नागपूर, बुलडाणा, सातारा हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे़ मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाणी टंचाई तीव्र आहे़‘वायू’ चक्रीवादळामुळे जूनमधील मान्सूनचे आगमन लांबले. पण जूनच्या अखेरच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले. कोकण, मुंबईत त्याने कहर केला़ मात्र, घाटावरून तो पुढे फारसा सरकला नाही़ मध्य महाराष्ट्रातील सर्व धरणांतील पाणीसाठा अजूनही वाढलेला नाही़ राज्यात १ जून ते ३ जुलैपर्यंत २१३ मिमी पाऊस झाला जो सरासरीच्या ११ टक्के इतका कमी आहे़ कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पालघर (५७%), ठाणे (३७%) आणि मुंबई उपनगरात (७०%) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर (-४६) व सांगली (-२७) जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला. तेथे फक्त सरासरीच्या ३५% पाऊस आतापर्यंत पडला. धुळे (-१०), जळगाव (-२२), नाशिक (-२४ टक्के) हे जिल्हेही तसे कोरडेच आहेत.विदर्भातील ११ पैकी ७ जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस पडला. विदर्भात आतापर्यंत पावसाची सरासरी १९६़२ मिमी असते जी प्रत्यक्षात १४७़६ मिमी म्हणजेच २५ टक्के कमी आहे़ यवतमाळ (-४८), वाशिम (-४०), वर्धा (-३५), अमरावती (-३७), अकोला(-२२), गडचिरोली (-३२), चंद्रपूर(-१६ टक्के) कमी पाऊस झाला आहे़जुलै उजाडूनही धरणे कोरडीमराठवाड्यात १ जून ते ३ जुलैदरम्यान १५५़१ मिमी सरासरी पाऊस पडतो़ यंदा १०८़४ मिमी पाऊसच पडला. त्यातही ६ जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस झाला. जुलै उजाडूनही धरणे कोरडीच आहेत़ औरंगाबाद १२१़९ (-१३ ), बीड ९३़२(-३४), हिंगोली ८०़८ (-५८), जालना १४०़२ (-६), लातूर ११६़४ (-२३), नांदेड ९१़९ (-४७), उस्मानाबाद १०८़१(-२३), परभणी ११३़४ (-३२ टक्के) इतका पाऊस झाला.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 6:12 AM