दीपक भातुसे -
मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या नव्या पॅटर्नबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावर अकरा दिवस लोटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.
नवा परीक्षा पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा विरोध करत २०२५ सालापासून तो लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत त्याच दिवशी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैैठकीत याबाबत चर्चा झाली आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून नवा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून अकरा दिवस उलटले तरी याबाबत एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही.
विद्यार्थ्यांनी अभ्यास कोणत्या पॅटर्नचा करायचा? मुख्यमंत्र्यांनी ३१ जानेवारी रोजी विनंती केल्यानंतर नवा पॅटर्न २०२३ पासूनच लागू करावा, अशी मागणी करत ३ फेब्रुवारी रोजी पुण्यात काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे आता एमपीएससी नवा पॅटर्न २०२३ पासून लागू करणार की २०२५ पासून असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा संभ्रम असल्याने पुढील परीक्षेचा अभ्यास कोणत्या परीक्षा पॅटर्नच्या आधारे करायचा याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी एमपीएससीने तातडीने याबाबत खुलासा करण्याची आवश्यकता असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.'
यूपीएससीच्या धर्तीवर बदल -- सध्या राज्य सेवा मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) आहे. एकूण ८०० गुणांपैकी केवळ १०० गुणांची वर्णनात्मक लेखी उत्तरे लिहावी लागतात. - नव्या पॅटर्ननुसार मुख्य परीक्षा एकूण १,७५० गुणांची असेल आणि ही पूर्ण परीक्षा पूर्णपणे वर्णनात्मक लेखी स्वरूपाची असेल. - राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती नागरी सेवा परीक्षेप्रमाणे (यूपीएससी) करण्यासाठी आयोगाने हा बदल केला आहे.