मुंबई : सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल जानेवारी महिन्यात पूर्णपणे पाडल्यानंतर, हा पूल बांधण्यासाठी मुंबई पालिकेला अद्यापही वेळ मिळालेला नाही. त्यामुळे या परिसरातील स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न अद्याप जैसे थेच आहे. हा पूल बांधण्यासाठी अजूनह निविदा प्रक्रिया सुरूच आहे. हँकॉक पूल जुना आणि धोकादायक झाला होता, तसेच ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंचीही कमी असल्याने, मध्य रेल्वेवरील गाड्यांना भायखळा व सँडहर्स्ट रोडदरम्यान वेगमर्यादा घालण्यात आली होती. या पुलावर पालिकेकडून १८ नोव्हेंबर २०१५पासून हातोडा चालविण्यात आला आणि हँकॉक पूल वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर येणाऱ्या या पुलाचा महत्त्वाचा भाग २०१६च्या जानेवारी महिन्यात ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. पूल तोडल्यामुळे स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. हा पूल नव्याने मुंबई पालिकेकडून बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र, काळ्या यादीतील कंत्राटदारांना हे काम पालिकेने दिल्याचे समोर येताच, त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. पूलच नसल्याने अनेकांकडून रूळ ओलांडण्याचा धोका पत्करला जात आहे. गेल्या वर्षभरात रूळ ओलांडताना १८ जणांना ट्रेनची धडक लागून मृत्यूला सामोरे जावे लागल्याची बाब समोर आली आहे. (प्रतिनिधी)
वर्ष उलटूनही हँकॉक पुलासाठी मुहूर्त मिळेना
By admin | Published: January 24, 2017 4:46 AM