चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:31 AM2023-05-20T06:31:40+5:302023-05-20T06:34:04+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत.
मुंबई : महायुतीमध्ये लोकसभेच्या ४८ पैकी गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा आमची शिवसेनाच पुन्हा लढणार, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीत परत एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
गेल्यावेळी आमच्या १९ जागा (राज्यातील १८) निवडून आल्या होत्या. त्या आमच्याकडेच राहतील. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आणि काँग्रेसने एक. जागावाटपात त्यावर कशी चर्चा होणार? त्या त्यांच्याकडेच राहतील, असे राऊत यांनी नांदेडमध्ये पत्रकारांना सांगितले. महाविकास आघाडी एकत्रितच लढेल, असे ते म्हणाले.
असली विधाने करू नयेत : पटाेले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत. भाजपला हरविण्यासाठी जागा केवळ लढणे नाही, तर जिंकणे महत्त्वाचे आहे. मविआच्या रणनीतीवर परिणाम होईल असे कोणीही बोलू नये, असे पटोले मुंबईत म्हणाले.
मविआत अस्थिरता : आंबेडकर
ईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो, ते खूप महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर आघाडीचे जागावाटप शक्य नाही. कर्नाटकच्या निकालानंतर नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे मविआत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.