संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल सुमारे ५० टक्के मदतान झाले. मतदारांनी आपला कौल इव्हीएममध्ये नोंदवला. आता २ मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मतदारांनी कुणाला कौल दिला हे समोर येणार आहे. मात्र मतमोजणीपूर्वीच कसबा पेठ मतदारसंघातील भाजपा उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाकडून हेमंत रासनेंविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा उमेदवार हेमंत रासने काल मतदानकेंद्रावर मतदानाला जाताना गळ्यात कमळाचे चिन्ह असलेले उपरणे घालून गेले होते. मतदान केंद्रामध्ये जाताना कुणालाही प्रचार होईल, असं साहित्य घेउन जाता येत नाही. मात्र हेमंत रासने हे गळ्यात कमळाची छाप असलेले उपरणे घालून गेल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, रासने यांच्या कृतीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये हेमंत रासने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याने पुढच्या काही दिवसांत हेमंत रासने यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत मतदान करताना फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल मतदान केल्यानंतर आपण कुणाला मत दिलं याचा फोटो ट्विट केला होता.