Jayant Patil NCP, Vishalgad Controversy: विशाळगडाच्या पायथ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील गजापूर या मुस्लीम बहुल वाडीतील घरात घुसून नासधूस करणे आणि तेथील धार्मिक स्थळाचीही तोडफोड करण्याच्या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने निषेध करत आहे. शिवप्रेमाच्या नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेवर मत व्यक्त केले.
जयंत पाटील म्हणाले, "विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण सनदशीर मार्गाने हटवण्याच्या प्रशासनाच्या कृतीला आमचे पूर्ण समर्थन आहे. मात्र विशाळगडाला प्रचंड पाऊस असल्याकारणाने हे अतिक्रमण पावसाळ्यानंतर काढणे मानवतावादी दृष्टिकोनातून अधिक योग्य ठरले असते. मात्र, विशाळगडाच्या पायथ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील गजापूर या मुस्लीम बहुल वाडीतील घरांत घुसून नासधूस करणे आणि तेथील धार्मिक स्थळाचीही तोडफोड करण्याच्या काही समाजकटंकांच्या कृतीचा आम्ही कडक शब्दांत निषेध करतो."
"शिवप्रेमी नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती. गजापुर येथील मुस्लिम बांधवांना लक्ष्य करत थेट हल्ला करण्यात आला आहे. या राज्यातील नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यात हे सरकार असमर्थ ठरत आहे अशी टीका करत असताना अशा हल्लेखोरांवर कडक अजामीनपात्र कलमे लावून या हल्ल्यात विस्थापित झालेल्यांचे पुनवर्सन करण्यासाठी सरकारने त्वरित कार्यवाही करावी," अशीही मागणी त्यांनी केली.