- किशोर वंजारी। लोकमत न्यूज नेटवर्क
नेर (यवतमाळ) : सुटाबुटातला नवरदेव गाडीतून उतरला... मंडपात तोऱ्यात दाखल झाला... वधू-वर एकमेकांना हार घालणार, इतक्यात चित्रपटासारखी पोलिसांची एंट्री झाली. ‘रूक जाओ... ये शादी नहीं हो सकती!’ सारा मांडवच हादरला. काही कळायच्या हात पोलिसांनी नवरदेवाला बेड्या ठोकल्या आणि वाहनात कोंबून घेऊन गेले... तालुक्यातील व्याहाळी गावातील लग्नमंडपात शुक्रवारी घडलेला हा प्रकार वधूपक्षासाठी मोठा आघात ठरला.लग्न करायला आलेला हा नवरदेव म्हणजे अट्टल चोरटा होता. सुनील तेजराम जाधव, असे या भामट्याचे नाव आहे. अकोट येथील मुद्रिका चंद्रभान पटेल (४२) यांना अवघ्या ३० लाखांत दोन किलो सोने देण्याचे आमिष सुनीलने दाखविले होते. नंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी मुद्रिकाला रेणुकापूर येथे बोलावून आपण पोलीस असल्याची बतावणी केली आणि मुद्रिकाकडून एक लाख उकळले होते.नेर पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४५ हजार हस्तगत केले. मात्र सुनील फरार होता. सुनीलचे लग्न नेर तालुक्यातील व्याहाळी येथे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वधूमंडपात सापळा रचून नवरदेव सुनीलला बेड्या ठोकल्या.