माधुरी सरवणकर, पुणे न्यायालयाच्या आदेशामुळे शहराच्या विविध भागांत महापालिकेने नाईट शेल्टर उभारली खरी; मात्र त्याची माहिती गरजवंतांनाच नसल्याने अनेक बेघर पुण्यात रस्त्यावर कुडकुडतच झोपत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.पुण्यातील स्वारगेट, संचेती ब्रीज, झेड ब्रीज, पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना नदीपात्र, पुणे विद्यापीठ पूल या ठिकाणी पाहणी केली. येथे रस्त्यावरच आयुष्य कंठणाऱ्या अनेकांशी संवाद साधला असता त्यांना नाईट शेल्टरबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. पुणे शहरामध्ये नवी पेठ, सेना दत्त पोलीस चौकीजवळ, पुणेस्टेशन पी.एम.टी डेपोजवळ, येरवडा गाडीतळ जवळ व दूधभट्टी बोपोडी या चार केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी १९३ लोकांसाठी झोपण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु, याचा वापर अगदी थोड्या जणांकडून होतो. रस्त्यावरील राहणाऱ्यांची संख्या मोजण्यासाठी तीन वर्षांपूर्वी महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाद्वारे पाहणी करण्यात आली होती. नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे सर्वे करण्यात आला. त्यामध्ये केवळ ८५०- ९५० बेघर रस्त्यावर झोपत असल्याचे आढळून आले. त्यातील फक्त २० टक्के लोक रात्री निवाऱ्यासाठी नाईट शेल्टरचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे विद्यापीठ ब्रीजच्या खाली राहणाऱ्या लक्ष्मीबाई काळे म्हणाल्या, की १० वर्षांपासून मी येथे राहत आहे. थंडी व पावसामध्ये रस्त्यावर राहणे फार अवघड जाते.. परंतू आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरच राहावे लागते. नाईट शेल्टर बद्दल मला माहितीच नाही. पुण्यात २०० लोकांकरिता नाईट शेल्टरनागरवस्ती विकास योजनेंर्तगत पुणे शहरातील सुमारे २०० लोकांकरिता नाईट शेल्टरची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. सेनादत्त पेठ येथे ४०, पुणे स्टेशन येथे ७०, येरवडा गाडीतळ येथे ५०, औंध दूधभट्ट्ी येथे ३० लोकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. नाईट शेल्टरमध्ये पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु लोक या योजनेचा फायदा उचलत नाही आहे. लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी नाईट शेल्टर उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही आहे. तसेच उभारलेली केंद्र लोकांच्या कामधंद्यापासून लांब आहेत. माहिती फलक, काही सामाजिक संस्था व पोलिसांमार्फत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.- हनुमंत नाझीरकर, प्रकल्प प्रमुख, नागरवस्ती विकास योजना
थंडीतही बेघरांचा ‘रात्र निवारा’ रस्त्यावरच
By admin | Published: December 21, 2015 12:57 AM