विवेक चांदूरकर/ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 23 - जर शासन आपल्याला दिवाळीपूर्वी पगार देत तर नागरिकांना, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी, सुविधाही दिवाळीपूर्वीच मिळायला हव्यात, अशी भूमिका महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन, स्वस्त धान्य, रॉकेल व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाची मदत नागरिकांना दिवाळीपूर्वीच मिळणार आहे.गत आठवड्यात शासनाने या महिन्याचे वेतन नेहमीप्रमाणे पुढील महिन्यात न देता याच महिन्यात दिवसांपूर्वीच देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवत जर शासन आपल्याला दिवाळीच्या आधी वेतन देते तर गरीबांना त्यांच्या हक्काच्या असलेल्या सूविधाही नेहमीप्रमाणे पुढील महिन्यात न देता दिवाळीपूर्वीच देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.त्यानुसार संदेश तयार करून अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अप गृपवर टाकण्यात आले आहेत. तसेच शासनालाही पत्र पाठवून पुढील महिन्यात मिळणारे अनुदान किंवा मानधन याच महिन्यात देण्याची विनंती करण्यात आली आहे. निराधार व असहायलाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दर महिन्यात ६०० ते ९०० रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते. सदर मानधन महिना संपल्यानंतर पहिल्या आठवड्यात देण्यात येते. मात्र, आॅक्टोंबर महिन्यात दिवाळीपूर्वीच सदर मानधन लाभार्थ्यांना मिळावे, यासाठी अधिकारी प्रयत्न करणार आहेत. यासोबतच स्वस्त धान्य व रॉकेला लाभार्थ्यांना महिना संपल्यानंतरच दिल्या जाते.मात्र, आॅक्टोबर महिन्यात स्वस्त धान्य व रॉकेल शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी मिळण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. यासोबतच कुटुंब अर्थसहाय्य योजनेने अनुदान व गरीब, गरजूंना मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान नोव्हेंबर महिन्यात न देता आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व दिवाळीपूर्वीच देण्याचेप्रयत्न अधिकाऱ्यांनी चालविले आहे.जिल्ह्यात परतीचा पाऊस व गारपीट झाली. यामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाईची रक्कम अधिकाऱ्यांकडे आली आहे. हा निधी नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याकरिता अधिकारी प्रयत्नशील आहेत.यासोबतच नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, बोनस व आणखी देण्यात येणाऱ्या सुविधा दिवाळीपूर्वी कशा मिळेल, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वांचीच दिवाळी आनंदाची जावी, याकरिता अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून लाभ मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. आम्हाला दिवाळीपूर्वी पगार मिळाला तर सामान्य नागरिकांनाही दिवाळीपूर्वी लाभ मिळायला हवा, असा आमचा उद्देश आहे.- करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, बुलढाणा
दिवाळीपूर्वी पगार घेतो, तर लाभार्थ्यांना सुविधाही दिवाळीपूर्वीच देणार!
By admin | Published: October 23, 2016 12:09 PM