lokmat maharashtrian of the year 2025 Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५' कार्यक्रमात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. मुलाखतीच्या शेवटी जयंत पाटलांनी फडणवीसांना पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विरोधी आमदारांच्या संख्येचा उल्लेख करत जयंत पाटलांनी केलेल्या एका विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांनाही हसू आवरता आले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांना पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
जयंत पाटील काय बोलले, वाचा जसंच्या तसं
जयंत पाटील म्हणाले, "आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले व्यक्तिमत्व आणि स्वभाव हा फार गोड आहे. कितीही शत्रूत्व कोणाबरोबर असले, तरीही तुमचा गोडवा कमी होणार नाही. आणि तो होऊही नाही, असं मला वाटतं."
"विरोधकांशी संवाद राहावा, असं पहिलंच भाषण आपण केलं. विरोधकांशी संवाद ठेवला तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते. विरोधकांची संख्या कमी आहे. ४०-५० लोकं आहेत. त्यामुळे पूर्वी समोर असे बसलेले असायचे. आता आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत दिलं आहे."
पाच वर्षांची संधी फार कमी लोकांना मिळते
"महाराष्ट्राची प्रगती ६-७ टक्क्यांनी न होता, महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढावी. महाराष्ट्रातील दळणवळण वाढावं, यासाठी या पाच वर्षांची फार कमी लोकांना संधी मिळते. मी समजतो की, महाराष्ट्रात शरद पवारांनी ही संधी मिळाली. त्यावेळी प्रचंड वेगाने विकास झाला."
"तुम्ही स्वकर्तबगारीतून २०१४ ते २०१९, ही पाच वर्षे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता पुढची पाच वर्षे आपण दिल्लीला जाणार नाहीत, हे गृहीत धरून मी उल्लेख करतो. या पाच वर्षात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र जो पाच-सहाव्या क्रमांकावर गेला आहे. पुढच्या पाच वर्षात पहिल्या क्रमांकाचं राज्य होईल असा दृष्टिकोण तुम्ही ठेवाल, असा मला विश्वास आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत."
तुम्ही महाराष्ट्राला एक नंबरवर आणाल
"शेवटी विरोधी आणि सत्तारूढ पक्ष मिळून महाराष्ट्राच्या प्रगती भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. शेवटी गरिबातील गरीब माणसाला जगण्यासाठी शेजारच्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिक संधी मिळेल, असाच दृष्टीकोण तुमचा आहे. या तुमच्या पाच वर्षांच्या प्रवासात तुमच्यावर कोणत्याही शक्तीचा परिणाम होणार नाही. आणि स्वछंदपणाने तुम्ही महाराष्ट्राला एक नंबरवर आणाल."
चमत्कार होण्याचेही स्वप्नही पडत नाहीत -जयंत पाटील
"आम्ही तर काय ४०-५० लोकं आहोत. त्यामुळे आमचं काय होईल आणि काही चमत्कार होईल, हे स्वप्नही आता पडायचं बंद झाले आहे. (हे ऐकून देवेंद्र फडणवीस हसले आमि म्हणाले, 'नानाभाऊ पटोलेंना अजूनही स्वप्न पडते.) मी चर्चा करतो त्यांच्याशी. पण, आपल्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची साथ दिसतेय, त्यामुळे एक नंबरचं राज्य करायला माझ्या शुभेच्छा", अशा शब्दात जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.