मुंबई : मी निलंबित असल्याच्या काळातदेखील मुंबई पोलीस दलाच्या नव्हे तर देशातील अन्य काही तपास यंत्रणांच्या तपास कार्यात सहभागी होत असे, असा गौप्यस्फोट बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने सोमवारी न्या. कैलास चांदीवाल आयोगासमोर केला.माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी पुन्हा एकदा चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी त्यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी सचिन वाझेला काही प्रश्न केले. त्यांच्या उत्तरात सचिन वाझे म्हणाला की, निलंबनाच्या काळात मी मुंबई पोलीस मुख्यालयाशी संलग्न होतो; पण जणू काही मी सेवेत आहे, अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या तपासात माझी मदत घेतली जात होती. घटनास्थळाचे पंचनामे करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे, साक्षीदार, संशयित यांचा तपास करणे ही कामे मी करीत असे.पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या वेळी रायगड पोलिसांनी माझी मदत घेतली होती. तसे मी मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या निर्देशांवरून केले होते, असे वाझेने स्पष्ट केले. वाझेची उलटतपासणी मंगळवारीदेखील सुरू राहणार आहे. उद्या ते काय बोलणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निलंबनाच्या काळातही मी तपास कार्य करायचो, चांदीवाल आयोगासमोर वाझेचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:26 AM