मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली असून आता कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. पुढील काही दिवसांत हा निकाल लागण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि अजित पवारांबद्दल आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात १६ आमदार अपात्र झाले तरी सरकार पडणार नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, आज सत्ताधाऱ्यांसोबत १६५-१७० आमदार आहेत. त्यातील १६ आमदार अपात्र झाले तरी ते सरकार बहुमतात राहते. यात राष्ट्रवादीचा काहीच संबंध येत नाही. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आमदार अपात्र झाले तर केंद्र सरकारला इथं राष्ट्रपती राजवट आणावी लागेल असं मी वारंवार सांगितले आहे असं त्यांनी सांगितले.
तर जीवनामध्ये जर-तर याला काही अर्थ नसतो. कुणीही घेऊ नये. सुप्रीम कोर्टाचा निकालावर आतापासून प्रश्नचिन्ह उभे करणे योग्य नाही. आम्ही नेहमीच राष्ट्रवादीचे विरोधक आहोत. आमची विचारधारा आणि त्यांची विचारधारा एक होऊ शकत नाही. आम्ही वैचारिक विरोधक आहोत असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येण्यावर भाष्य केले आहे.
अंजली दमानियांचा मोठा दावा समाजसेविका अंजली दमानिया यांच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार' त्या म्हणाल्या की, मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले असे दमानियांनी स्पष्टीकरण दिले.