मुंबई : ‘भारतमाता की जय’ हा कोणत्याही धर्माचा नारा नाही, तर ती देशप्रेमाची घोषणा आहे. त्यामुळे माझे पद गेले तरी मी ‘भारतमाता की जय’ म्हणणारच, असे ठणकावून सांगत विरोधकांनी केलेली माफी मागण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली.शनिवारी नाशिक येथे भाजपाच्या बैठकीत बोलताना ‘भारतमाता की जय म्हणणार नाहीत, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही,’ असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभा व विधान परिषदेत उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्रिपद हे घटनात्मक आहे तेव्हा घटनेची चौकट झुगारून मुख्यमंत्र्यांनी विधाने करणे हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. हा अजेंडा कोणाचा आहे, असे विचारत अल्पसंख्याकांना देशभक्ती सिद्ध करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या दालनातून देशभक्तीची एनओसी घ्यावी लागेल का? असा हल्लाबोल विखे पाटील यांनी केला. त्या वेळी मुख्यमंत्री सभागृहात नव्हते. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी पुढील कामकाज पुकारताच संतप्त झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यवेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यानंतरही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड संतप्त होऊन बोलले. त्यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आव्हाड यांच्यावर नेम साधत,‘तुमच्या देशभक्तीविषयी आणि इशरतच्या प्रेमाविषयी आमच्या मनात शंका नाही, असा चिमटा काढल्यानंतर वातावरण अधिकच तापले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तिरंगी झेंडे फडकावले. दोन्ही बाजूने शिवराळ घोषणाबाजीही झाली. गोंधळामध्ये कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, मी नाशिकमध्ये जे बोललो तेच मी खुलाशात सांगितले आहे. मी कोणत्याही धर्माचे नाव घेतले नाही. कुणावर आक्षेप घेतला नाही. पण ‘भारत माता की जय’ म्हणणार नाहीत त्यांच्या मनात या देशाबद्दल प्रेम नाही त्यांना या देशात राहता येणार नाही, यात मी काय चूक केली? मुख्यमंत्री पद राहते की जाते याची पर्वा नाही; पण मी काल भारत माता की जय म्हणालो, आजही म्हणतो व उद्याही म्हणेन! देशातली हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन सारेच भारत माता की जय म्हणतात. वाघा सीमेवर जमलेले सर्वधर्मीय भारतीय आणि तिथे तैनात जवान ‘वंदे मातरम‘ आणि ‘भारत माता की जय’ अशा दोनच घोषणा देतात, असे फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेत जेंव्हा एमआयएमच्या एका आमदाराने घोषणा देण्यास नकार दिला तेंव्हा तुमच्यासह सर्व सदस्यांनी त्यांच्या हकालपट्टीचा ठराव केला याची आठवण करून देत या विषयावर हकनाक विवाद करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही विरोधकांना सुनावले.झेंडा उलटा फडकविलागदारोळ सुरू असतानाच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी तिरंगा झेंडा फडकविला. अन्य विरोधी सदस्यांनाही त्यांनी झेंडे दिले. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी तो उलटा फडकविल्याची बाब तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी लक्षात आणून दिली पण ध्वज उलटा फडकविण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता आणि त्यांनी झेंडा लगेच सरळही केला, असेही स्पष्ट केले. तथापि, महसूल मंत्री खडसे यांनी हाच धागा पकडून त्यांना सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तेव्हा, व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून आपण निर्णय देऊ, असे सागर यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्रिपद गेले तरी ‘भारतमाता’ म्हणणारच
By admin | Published: April 05, 2016 2:34 AM