- नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबईमध्ये कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बाजार समितीमध्ये फक्त १० टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवतात. उर्वरित ९० टक्के आवक नाशिक, पुणे व इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडूनच होते. भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी येत असताना दुसरीकडे घाम गाळून उत्पादन करणाऱ्या बळीराजालाही ही स्थिती पहात बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. चीनपाठोपाठ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश असलेल्या भारतामधील सर्वच राज्यांत कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. देशात सर्वाधिक कांदा महाराष्ट्रात पिकत असून येथील बहुतांश किरकोळ मार्केटमध्ये चांगला कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रत्यक्षात या भाववाढीचा सामान्य शेतकऱ्यांना फारसा लाभ झाला नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये स्वत: शेतकरी माल पाठविण्याचे प्रमाण फक्त दहा टक्केच आहे. मार्केटमध्ये शेतकरी दिसतच नाहीत. व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता थेट शेतकऱ्यांकडून खूप कमी माल येत असल्याची माहिती देण्यात आली. गारपिटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. कांदा पिकविण्यासाठी आलेला खर्च भरून काढण्यासाठी कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाची मार्च ते मे दरम्यानच विक्री केली आहे.मुंबईमध्ये फक्त दहा टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवत आहेत. कधी - कधी हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांवर जाते. उर्वरित ९० टक्के कांदा हा नाशिक, पुणे, कर्नाटक परिसरातील व्यापारीच पाठवत आहेत. ज्यांच्याकडे चाळीमध्ये माल साठविण्याची क्षमता आहे व ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आहे त्यांनी मार्च ते मे दरम्यान १० ते १३ रुपये दराने कांदा विकत घेऊन तो चाळीमध्ये साठवला आहे. भाववाढ झाल्यानंतर हा माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला जात आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज किती शेतकरी येतात याचे सर्वेक्षण केले तरी वास्तव समोर येईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कर्नाटकचाही कांदा मुंबईतमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तसह कर्नाटकचा कांदाही विक्रीसाठी आला आहे. इजिप्तच्या कांद्याचा आकार मोठा असल्यामुळे सामान्य ग्राहकांची त्याला पसंती मिळत नाही. होलसेल मार्केटमध्ये कांदा ४० ते ६० रुपये किलो दरानेच विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर आहेत. गगनाला भिडलेले भाव अद्याप कमी झालेले नाहीत. सरकारने आयातीला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. इजिप्तवरूनही कांदा मागविण्यात आला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये ५६ वाहनांमधून ६२८ टन कांद्याची आवक झाली आहे. ९० टक्के कांदा हा नाशिक, पुणे, कर्नाटक परिसरातील व्यापारीच पाठवत आहेत, उर्वरित माल हा महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिसरातून येत आहे.शेतकरी व ग्राहक दोघांच्याही डोळ्यात पाणी : बाजार समितीमध्ये आलेल्या पुणे जिल्ह्णातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, भाववाढ झाल्यामुळे मुंबईतील ग्राहकांना ८० रुपये किलो दराने कांदा घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना खूप फायदा होत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. परंतु छोट्या शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा मार्च ते मे दरम्यान १० ते १३ रुपये दराने विकला आहे. कारण त्यांना कांदा साठवणे परवडत नाही. परिणामी भाववाढीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांच्याही डोळ््यांत पाणी आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कांदा महाग झाला तरी शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच
By admin | Published: August 27, 2015 2:10 AM