महाराष्ट्र शासनाच्या वतीने अखेर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सामान्य नागरिकांकडूनदेखील सरकारच्या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने धार्मिक स्थळे खुली केली असली तरीदेखील सर्व धार्मिक स्थळांच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांबाबत घेतलेला निर्णय म्हणजे भाविकांसाठी दिवाळीची भेट आहे. सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने रविवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आता जबाबदारी न्यासाची पण आहे. सगळ्या देवस्थानांची पण आहे. भाविकांची काळजी आणि सुरक्षा लक्षात घेता आता आम्ही एवढेच आवाहन करतो की, जेव्हा दर्शन सुरु होईल तेव्हा दर्शन कशा पध्दतीने करायचे आहे? याबाबत आम्ही रविवारी जाहीर करु. फक्त गर्दी करु नये. सावकाश दर्शनासाठी आपण सहकार्य केले तर व्यवस्थित दर्शन होईल. दर्शनाबरोबरच कोणत्याही पध्दतीचा गोंधळ, संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणार आहोत. सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.- आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. मंदिरे कधी खुली होत आहेत? याची नागरिक वाट पाहत होते. प्रतीक्षा होती. कारण आपली मंदिरे आपली श्रद्धास्थाने आहेत. भारतीयांमध्ये मनोबल आणि आत्मबल वाढविण्याचे काम मंदिरांतून केले जाते. हे एक माध्यम आहे. खासकरून कोरोना काळात झालेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कोरोना संपलेला नाही. आपण सावधान राहिले पाहिजे. सतर्क राहिले पाहिजे. कोरोनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. सामाजिक अंतर राखले गेले पाहिजे. मास्क घातले गेले पाहिजेत. अति उत्साह आणि गोंधळ नसावा. जेणेकरून कोरोना वाढेल.- आचार्य लोकेशजी, संस्थापक, अहिंसा विश्व भारती
धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे. आता सर्वसामान्यांनी धार्मिक स्थळांवर गेल्यावर नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच राज्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्त तसेच सदस्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये सुरक्षित अंतर राहील तसेच सर्व काळजी घेतली जाईल ही जबाबदारी घ्यावी. मंदिर, मशीद व चर्चमध्ये नागरिकांना वेळेचे नियोजन करून देणे गरजेचे आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, उपाध्यक्ष, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन
धार्मिक स्थळे खुली करण्याकरिता सरकारने उशीर केला आहे. हा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता. ज्याप्रमाणे रेल्वे आणि बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रवास केला जात होता त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांवरमध्येदेखील नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवेश दिला जाऊ शकत होता. सरकारने मंदिर, मशीद, चर्च खुले करण्याला विलंब केल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.- सलीम खान, सदस्य, गौसिया मशीद, धारावी