- दीप्ती देशमुखमुंबई - एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही. तर जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युपत्रात त्याच्या वारसदारांच्या नावाचा उल्लेख असेल, तरच संबंधित त्या भूखंडामध्ये हिस्सा मागू शकतात, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.पुण्यातील हवेली तालुक्यातील उल्काबाई जाधव (बदललेले नाव) यांनी स्वत:च्या कमाईतून १९२२ मध्ये एक भूखंड खरेदी केला. या भूखंडाच्या खरेदीखतावर त्यांनी त्यांच्या गणपत, राम, लक्ष्मण (बदललेली नावे) या तीन अल्पवयीन मुलांची नावे नमूद केली. त्यापैकी गणपतचा तरुणवयात मृत्यू झाला. तर सर्वात छोटा भाऊ लक्ष्मण याला दत्तक देण्यात आले. राम यांच्या दोन पत्नींचा मृत्यू झाला. त्यांनी तिसरा विवाह झाला. मात्र, रामशी पटत नसल्याने त्यांच्या पत्नी यमुना (बदललेले नाव) आपल्या भावाबरोबर राहत आहेत. राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने संपूर्ण भूखंडाचे मालक आपण असल्याचा दावा केला. तर लक्ष्मण व त्यांच्या मुलांनीही या जमिनीवर दावा केला. लक्ष्मण यांनी खरेदीखतावर आपले नाव असल्याचे दाखविले तर त्यांचा मुलगा किरणने (बदललेले नाव) राम याने आपल्याला दत्तक घेतल्याचे दिवाणी न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने यमुना आणि किरण या दोघांना संबंधित भूखंडाचा समान वाटा देत त्यांचा अर्ज निकाली काढला.या निर्णयाला यमुना, लक्ष्मण आणि लक्ष्मणच्या मुलाने फर्स्ट अपील न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयाने लक्ष्मण व त्याच्या मुलाचा दावा फेटाळत यमुना हिला संपत्तीचे मालक म्हणून जाहीर केले. या निर्णयाला लक्ष्मण व किरणने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने त्याला दत्तक देण्यापूर्वी भूखंडाच्या खरेदीखतावर त्याचे नाव घातले आहे. आई व दोन्ही भावांचे निधन झाल्याने संपूर्ण भूखंड आपल्याच नावावर करण्यात यावा.यमुनाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. उल्काबाई यांनी खरेदीखतावर तिन्ही मुलांची नावे घातली असली तरी भूखंडाचा हिस्सा हिंदू वारसा कायद्याप्रमाणे करावा लागेल. कारण उल्काबाई यांनी हा भूखंड स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी केला आहे. संबंधित भूखंड हा वडिलोपार्जित किंवा एकत्र कुटुंबाचा नाही. त्यामुळे वारसदार जिवंत आहे की नाही, यावरून भूखंडाचा हिस्सा केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद यमुनाच्या वकिलांनी न्यायालयात केला.त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. उल्काबाई यांनी त्यांच्या तिन्ही अल्पवयीन मुलांची नावे खरेदीखतावर घातली म्हणून ते अमलात आणले त्याच दिवसापासून संबंधित भूखंड त्यांच्या नावे झाला, हे मान्य करणे कठीण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.मालक यमुनाचसंबंधित भूखंड उल्काबाई यांचा स्वअर्जित आहे. त्यामुळे हा भूखंड खरेदी केल्यानंतर लगेचच लक्ष्मण त्यावर दावा करू शकत नाही. उल्का यांचीही स्वअर्जित संपत्ती असल्याने त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांचे मृत्युपत्र उघडल्यानंतरच त्यांच्या संपत्तीचे वारसदार ठरू शकतात. मात्र, त्यांच्या मृत्यूपूर्वीच लक्ष्मण यांना दत्तक देण्यात आले होते आणि गणपतचा मृत्यू झाला. त्यामुळे राम यांच्या पश्चात या संपूर्ण भूखंडाची मालक यमुना आहेत, असे म्हणत न्यायालयाने लक्ष्मण व किरणचा अपील फेटाळला.
खरेदीखतावर नाव असले तरी संपत्तीचा वारस नाही - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 2:53 AM