पुणे – साईनाथ शहराध्यक्ष झाल्यामुळे माझी काहीच हरकत नाही. पुण्यात मनसे वाढावी हीच माझी भूमिका आहे. साहेब जे आदेश देतील त्याच्याशी एकनिष्ठ राहावं लागते. माझ्या मनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडण्याचा कुठलाही विचार नाही. सर्वपक्षाचे लोकं भेटतात. मी २७ वर्ष राजसाहेबांसोबत आहे, माझं शहराध्यक्ष पद गेले तरी महाराष्ट्र सैनिक पद कायम आहे अशा शब्दात मनसेचे नाराज नेते नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नगरसेवक वसंत मोरे(MNS Vasant More) म्हणाले की, संपर्कात खूप लोकं आहेत, पण मी कुणाशीही संपर्क केला नाही. मी भावूक आहे. २७ वर्ष राजसाहेबांसोबत आहे. मला मनसेच्या सगळ्याच नेत्यांचे फोन आले आहेत. एखाद्या सर्वसामान्य नेत्याची किती ताकद आहे ती गेल्या २ दिवसांपासून दिसून आली. मी मनसेसोबतच आहे. ही राजसाहेबांची ताकद आहे. पद काढलं याला हकालपट्टी म्हणत नाही. मनसेत आदेश येतो त्याचे पालन केले जाते. माझं कुणाचीही बोलणं झाले नाही. मी साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले. मला काही नेत्यांचे फोन आले साहेबांशी वेळ घेऊन भेटू. मला अपेक्षा नव्हती. मात्र मागच्या महिन्यात राजसाहेबांशी माझं बोलणं झाले होते. मी मे महिन्यापर्यंत शहराध्यक्ष राहील असं सांगितले होते. कारण काही लोकांमुळे पक्ष वाढवणं कठीण आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या १० महिन्यात १४ वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात येऊन गेले. मी लोकप्रतिनिधी असल्याने काही जणांना खटकणारी बाब आहे. मी एकमेव नगरसेवक आहे जो १५ वर्ष पक्षाच्या तिकीटावर निवडून आलो आहे. मला प्रत्येक पक्षातून बोलावणं होतंय. परंतु मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी एकनिष्ठ आहे. अजून निवडणुकीला सहा महिने आहेत. बरेच पाणी पुलाखालून जायचं आहे. मी लोकप्रतिनिधी आहे. माझा भाग शांत राहावा हीच माझी भूमिका असेल. मी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतच राहीन. कब्रस्तानावरील राजसाहेबांच्या नावाला काळं फासलं त्याची मी पोलीस तक्रार केली आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल. साईनाथ बाबर यांच्या वार्डातही मुस्लीम मतदार आहेत. त्यांची नाराजी आहे की नाही हे मी बोललो नाही. मी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली होती अशीही माहिती वसंत मोरे यांनी दिली.