राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस अनेक घडामोडींमुळे चांगलाच गाजला. त्यात अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मागच्या पाच वर्षांत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात समोरासमोर भेट होऊन दोघांनीही एकत्र लिफ्टने प्रवास केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या भेटीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टमधील प्रवासाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तसेच दोन वर्षांपूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे, ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. त्यामुळे काही लोकं बोलताहेत, काही लोकं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून तिसऱ्यांदा पेढे वाटताहेत, आनंद आहे, चांगलं आहे, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. भाजपाच्या २४० जागा आल्या. तर इंडिया आघाडीच्या सगळ्यांच्या मिळून तेवढ्या जागा आल्या नाहीत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर जनतेने तुम्हाला पराभूत केलं. एवढं खोटं नरेटिव्ह परवून, संविधान बदलणार, आरक्षण जाणार असं खोटं वातावरण निर्माण करूनसुद्धा या देशातील जनतेनं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं, याचा आनंद विरोधक साजरा करताहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.