लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयाची परीक्षा आवश्यक गुणांसह उत्तीर्ण होण्याचे दडपण प्रत्येक विद्यार्थ्यांवर असते. पण आता हे दडपण दूर करण्यात आले असून या विषयांत उत्तीर्ण होण्यासाठीची गुणमर्यादा आता ३५ वरून २० करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
याबाबत राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तरतूद करण्यात आली असून राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने नुकतीच त्याला अंतिम मान्यता दिली आहे. मात्र यंदाच्या परीक्षेत त्यानुसार कोणताही बदल होणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
यानुसार दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत. पहिल्या पर्यायानुसार नेहमीप्रमाणे पुन्हा परीक्षा देऊन या विषयांत उत्तीर्ण होता येईल. आणि दुसऱ्या पर्यायात विद्यार्थ्याला उत्तीर्ण म्हणून अकरावीला प्रवेश घेता येईल, मात्र पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारित अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही. त्याबाबत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरच शेरा देण्यात येणार आहे.