शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

बागायतदारही मजुरांच्या रांगेत

By admin | Published: March 28, 2016 3:00 AM

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर दोन हजार लोकसंख्येचे कौडगाव. द्राक्षासह विविध फळबागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव. तीन वर्षांपूर्वी येथे सुमारे २००

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर दोन हजार लोकसंख्येचे कौडगाव. द्राक्षासह विविध फळबागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव. तीन वर्षांपूर्वी येथे सुमारे २०० एकरवर द्राक्षांच्या बागा होत्या़ मात्र पावसाने डोळे वटारले आणि बागांवर कुऱ्हाड कोसळू लागली़ आज या शिवारात कशाबशा २० एकरावर बागा शिल्लक राहिल्या आहेत. कोट्यवधीचा व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर चढला आहे. बागायतदार शेतकरी मजुरांच्या रांगेत दिसत आहेत. या गावात २४ तास राहून केलेला आॅन द स्पॉट रिपोर्ट. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक गावांत असे भयाण चित्र दिसते. गावात जिल्हा परिषदेची पहिली ते ८ वी पर्यंतची शाळा आहे़ विद्यार्थी संख्या १७५ असून, शाळेची इमारतही टुमदार आहे़ मात्र, या शाळेलाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ अनेक विद्यार्थ्यांनी पिण्याचे पाणी घरातूनच आणावे लागते. मात्र, ते दिवसभर पुरणार कसे ? पूर्वी शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन ही मुले तहान भागवायची़ मात्र, टंचाईमुळे तेथेही पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. मुख्य गाव, बार्शीच्या दिशेला असलेला लमाणतांडा आणि उस्मानाबादच्या बाजूला असलेली झोपडपट्टी असे गावाचे तीन भाग असून, येथे नऊ सदस्यीय ग्रामपंचायत आहे़ गावात अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता दुष्काळामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने दिसून येत होती. ग्रामसेवक विवेक मटके म्हणाले, दुष्काळाने गावाचे अर्थकारणच कोलमडून गेले आहे. फळबागांचे सोडा, पिण्याचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न गावासमोर उभा आहे. झोपडपट्टी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या उजनी योजनेच्या वॉल्व्हवर दिवसभर पाण्याचा थेंब न् थेंब गोळा करीत बसलेल्या महिला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या़ एवढ्यात तांडा परिसरातील ताईबाई राठोड अंधारातही घागर डोक्यावर घेऊन निघालेल्या़ दुष्काळ सत्व परीक्षा पाहतोय.. पुढच्या वर्षी परिस्थिती सुधारेल, या आशेवर तीन वर्षे काढली़ मात्र, आता सहन होत नसल्याचे त्या म्हणाल्या़ दिवसभर शेतात राबले, आता दोन घोट पाण्यासाठी चार तास रांगेत उभा रहावे लागणार असे पुटपुटत तांड्यावरील लोकांकडे तर कोणाचेच लक्ष नाही. मायबाप सरकारने तांड्यावर येऊन पहावे, म्हणजे दुष्काळ काय असतो तो त्यांना कळेल असे त्या म्हणाल्या. रात्री नऊच्या सुमारास कौडगावच्या मुख्य चौकात असलेल्या शिवाजी पवार यांच्या हॉटेलच्या आवारात सचिन चव्हाण, सोमनाथ नाईकवाडी, भारत गरड, बल्लू थोरात, कानिफनाथ तानवडे, हणमंत अंकुशराव, सुनिल थोरात, रामलिंग अंकुशराव, ज्ञानेश्वर थोरात आदींच्या गप्पा रंगलेल्या. त्यांच्या बोलण्यातूनही दुष्काळाच्या झळा बाहेर पडू लागल्या. समस्यांचा गुंता वाढत होता़ त्यानंतर एक-एकजण घराकडे परतू लागला़ रात्री १० च्या सुमारास गाव सामसूम झाले़ हनुमान मंदिराच्या पारावर मोजकी ज्येष्ठ मंडळी बसलेली़ चर्चेचा विषयही दुष्काळच! कोणालाच देणं-घेणं नाही... यावर शेवट करीत ज्येष्ठही पारावरच निद्राधीन झाले़ पहाटे चार-साडेचारच्या सुमारास पुन्हा जागरहाट सुरू झाली़ पुढे दिवसभर तीच चिंता-चर्चा रोजगाराची आणि पाण्याची... हिरवेगार शिवार झाले भकास... गावात फेरफटका मारला असता अनेकजण मुख्य रस्त्यावरील हॉटेल तसेच पानाच्या टपरीवर गप्पा मारत असल्याचे दिसून आले़ यात कधीकाळी मोठे बागायतदार असलेल्यांचाही समावेश होता़ पोपट नाईकवाडी यांची एक एकराची द्राक्षबाग होती़ मागच्या वर्षीच त्यांनी ती तोडून टाकली आहे़ तेथेच मोहन हरी थोरात भेटले त्यांच्याकडेही द्राक्षबाग आहे़ मात्र, कसलेही उत्पन्न नाही. कधीकाळी हिरवेगार असलेले हे गाव आज भकास झाल्याने शेतशिवारात जावत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली़ कोणाला पाण्याची, तर कोणाला रोजगाराची चिंता सायंकाळी सहाच्या सुमारास गावातीलच पारावर महादेव मुंढे बसलेले होते. मिळेल त्या ठिकाणी मजुरीने जावून कुटुंबाचा गाढा कसाबसा हाकत असल्याचे त्यांनी सांगितले़ पाण्याअभावी बांधकामे बंद आहेत़ त्यामुळे रोजगार ठप्प झाला. शासनाने रोहयोची कामे सुरू करण्यासोबत मजुरीही वाढविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सायंकाळच्या सुमारास गाव काहीसे गजबजलेले दिसले़ मात्र, तरीही लोकांच्या चेहऱ्यावर तणाव कायम होता. कोणाला पिण्याच्या पाण्याची तर कोणाला रोजगाराची चिंता होती. कर्जवसुलीसाठी बँकेची नोटीस दुष्काळी परिस्थितीमुळे कर्ज थकबाकी वसुली थांबविण्याचे आदेश राज्य शासन देत असले तरी शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जाची वसुली केली जात असल्याचे दिसून आले़ मधुसूदन विश्वनाथ शिंदे या द्राक्षबागायतदाराने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उस्मानाबाद शाखेतून ३ लाखांचे पीककर्ज घेतले होते़ मात्र, पाण्याअभावी काहीच उत्पन्न हाती लागले नाही़ बँकेचे हप्ते थकले, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ मात्र, बँकेने थकबाकी व त्यावरील व्याज तातडीने भरण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठविली आहे़ अशाच पध्दतीच्या नोटिसा गावातील अन्य शेतकऱ्यांनाही मिळाल्या आहेत़ उत्पन्नच मिळाले नाही तर बँकेचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्नही मधुसूदन शिंदे यांनी उपस्थित केला़ दोन वर्षांपासून नुकसानभरपाईही नाही मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसात गावातील फळपिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, बहुतांश बागायतदारांना नुकसानभरपाई मिळालेली नाही़ साधारणत: ९२५ सभासद असून, यातील २२५ जणांना पीकविमाही मिळाला नाही़ चालू वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अजून पंचनामे झालेले नसल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. शेतीची दुरवस्था झाल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत शासन-प्रशासनाने रोहयो कामे युद्धपातळीवर हाती घेण्याची गरज आहे. मात्र गावात रोहयोचे एकही काम सुरु नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गावातील ३९८ कुटुंबांनी कामासाठी नोंदणी केलेली आहे. अन्न कुठल्या प्रयोगशाळेत तयार होत नाही़ शेतकरी घामाने निर्माण करतो, याची जाण सरकारने ठेवायला हवी़ नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही़ रक्तरंजित क्रांतीची सुरूवात शेतशिवारातून होऊ नये, असे वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न सोडवायला हवे, असे सचिन चव्हाण यांनी सांगितले़ चार वर्षांपासून पाण्यासह रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. दोन विंधन विहिरींचे अधिग्रहण केले असले तरी टँकरची गरज भासत आहे़ शासनाने एमआयडीसीसाठी जमिनी संपादित केल्या आहेत़ यावर तातडीने उद्योग सुरू करावेत म्हणजे या भागातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल, असे मत सरपंच विजया थोरात यांनी व्यक्त केले़ आमच्या शेतात पाच बोअर आहेत़ यातील एका बोअरला केवळ ७० फुटावर पाणी होतं़ पाणी कमी पडू लागल्यानं ते बोअर ७०० फुटापर्यंत नेलं़ पण आता पाणी मिळत नाही़ जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटत असला तरी चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. जगणेच कठीण झाले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य हणमंत थोरात म्हणाले़ राज्य मार्गावर मी हॉटेल सुरू केले होते़ मागील वर्षापर्यंत व्यवसाय चांगला चालत होता़ मात्र, यंदा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने हॉटेलचा व्यवसाय बंद करावा लागल्याची खंत शिवाजी पवार यांनी व्यक्त केली़ हॉटेल बंद केल्याने आता कुटूंबाचा गाडा कसा हाकायचा याची चिंता लागल्याचेही त्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून माझ्या कूपनलिकेचे अधिग्रहण करून तांड्यावर पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ प्रारंभी वेळेवर पैसे मिळाले़ मात्र, सहा महिन्यांपासून बिल निघालेले नाही़ बिल निघत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन, प्रशासन दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची तक्रार संजय राठोड यांनी केली. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ पाण्यासाठी भटकंती केल्यानंतर आठ शेळ्या चारायला इतरांच्या शिवारात नेते़ मात्र, तिथेही चारा मिळत नसल्याने शेळ्यांची उपासमार होत आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासह चारा छावणी सुरू करण्याची गरज तारामती राठोड यांनी व्यक्त केली़ नदीला बारमाही पाणी होतं. मागच्या साली पाऊस पडला नाही़ त्यामुळे शेतातील पिकं वाया गेली़ बागांना पाणी कमी पडत आहे़ आमच्या काळात गावच्या नदीला बारमाही पाणी राहत होतं़ तेव्हा अनेक झाडे होती़ मात्र, आता झाडंही नाहीत आणि पाऊसही नसल्याचे ७० वर्षीय आप्पासाहेब कांबळे यांनी सांगितले़ पाण्याची टंचाई कधी नाही ती पहायला मिळत आहे़ आमच्या काळात गावातील नदी बारमाही वाहत होती़ आता शेतातील एकच बोअर चालते़ त्यातही केवळ दोन हौद भरतात़ त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. पण जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम असल्याचे ७२ वर्षीय इंदूबाई थोरात म्हणाल्या़ दुष्काळ निवारणार्थ शासनाकडून कुठली ठोस कृती होत नाही़ दुष्काळ आला की सरकारकडून योजनांची घोषणाबाजी केली जाते. मात्र या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत़ केवळ मलमपट्टी करून भागणार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करायला हवी आणि ते शक्य नसेल तर मागील चार वर्षाचे हप्ते आणि व्याज माफ तातडीने करण्याची गरज आहे. तरच या दुष्काळात शेतकरी तग धरू शकेल, अशी प्रतिक्रिया विकास शिंदे यांनी दिली.