पुणे : राज्यात गाजलेल्या शहरातील सोवळे प्रकरणाचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. या प्रकरणामुळे शहराची उंची कमी झाली आहे, त्याचा निषेध ही सभा करत आहे, असे म्हणत विरोधकांनी सभा तहकुबीची सूचना मांडली. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने काही शब्दांचा बदल करण्याची उपसूचना देत ही तहकुबी मंजूर केली.हवामान खात्याच्या माजी संचालक डॉ. मेधा खोले यांनी त्यांच्या स्वयंपाकी महिला निर्मला यादव यांच्याविरोधात सोवळे मोडल्यामुळे पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली. या प्रकरणाचा निषेध सभेत करण्यात आला. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले, नगरसेवक अविनाश बागवे यांनी सभा तहकूबीची सूचना मांडली.सत्ताधारी भाजपाकडून त्याला विरोध होईल, असे अपेक्षित होते, मात्र त्यांनीही या प्रकरणाचा निषेध केला. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी हे प्रकरण निषेधार्हच आहे, असे स्पष्ट केले. महापौर मुक्ता टिळक यांनी तहकुबीची सूचना स्वीकारत असल्याचे सांगितले. यावर चर्चा मात्र काहीच झाली नाही. तसेच डॉ. खोले यांनी तक्रार मागे घेतल्यानंतरही निर्मला यादव यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांकडे बदनामी केल्याचा दावा दाखल केला आहे. त्यावरही सभागृहात कोणी बोलले नाही. सभेच्या सुरुवातीला उपमहापौर डॉ. सिद्धाथ धेंडे यांचे वडील यशवंतराव धेंडे व अन्य दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.