- समीर परांजपेमुंबई : राजकारण्यांनी उंदरांसारखा देश पोखरला आहे असे टाळीबाज वाक्य नेहमी सभेत ऐकवले जाते. पण प्रत्यक्षात राजकारण्यांना उंदरांनी छळल्याची काही उदाहरणे देशभरात पाहायला मिळतात. तसे करण्यात उंदीर डावे-उजवे असा भेद करत नाहीत.
रायटर्समधील सुळसुळाटपश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रायटर्स बिल्डिंग ब्रिटिश काळात बांधली गेली. थॉमस लायन या वास्तुविशारदाने १७७७ साली तिचा मुळ आराखडा तयार केला होता. नंतर या इमारतीमध्ये विस्तारही झाले. स्वातंत्र्यानंतर राज्य सरकारची अनेक कार्यालये याच इमारतीत सुरु झाली. ४ आॅक्टोबर २०१३पर्यंत या इमारतीतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय होते. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते त्या काळातील गोष्ट आहे. रायटर्स बिल्डिंगमधल्या प्रत्येक कार्यालयामध्ये कागदपत्रांचा ढीग असल्याने तो माहोल उंदरांसाठी स्वर्गच होता. महत्वाची शासकीय कागदपत्रे उंदीर कुरतडत असत. त्यामुळे अशी कागदपत्रे फक्त राजकारणीच नष्ट करतात या आरोपातून तेव्हा तरी तत्कालीन माकप नेते सुटले असावेत! या उंदरांना मारण्याचे नानाविध उपाय योजून झाले पण काहीही उपयोग होत नव्हता. सरतेशेवटी या उंदरांचा खात्मा करण्यासाठी रायटर्स बिल्डिंगमध्ये ५० मांजरी पाळायचा निर्णय माकप सरकारने घेतला आणि मात्रा लागू पडली. या मांजरांनी रायटर्समधील उंदरांचा असा परिणामकारक रितीने फडशा पाडायला सुरुवात केली की बघता बघता काही हजार उंदीर यमसदनी गेले. उंदरांचा सुळसुळाट कमी झाला. गेल्या वर्षी जानेवारीतली गोष्ट आहे तीही कोलकातातीलच. डाव्यांना मनसोक्त छळल्यानंतर उंदरांनी ममता बॅनर्जी सरकारलाही सोडले नाही. पश्चिम बंगालच्या विधानसभा इमारतीत उंदरांनी धुमाकूळ घातला होता. खूप प्रयत्न करुनही त्यांची संख्या कमी होण्याचे काही कमी होत नव्हती. पश्चिम बंगालमधील तत्कालीन विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नान व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मानस भुनिया यांच्या कारच्या वायर उंदरांनी कुरतडल्या होत्या.मांझींना मिळालेले मुख्यमंत्रीपदराजकारणी व उंदीर या विषयाचा एक वेगळाच संबंध जुळून आला होता बिहारमध्ये. जितन राम मांझी हे बिहारचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून २० मे २०१४ रोजी विराजमान झाले खरे पण २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांना पायउतार व्हावे लागले. ते मुसहार या अनुसूचित जातीचे होते. मुसहार हे उंदीर पकडण्याचे काम करतात. ते बिहार, उत्तर प्रदेश, तराई, नेपाळ या भागात जास्त करुन आढळतात. समाजातील या दुर्बल घटकातील एका व्यक्तीला बिहारचे मुख्यमंत्रीपद मिळाले याबद्दल त्यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला होता. जितनराम मांझी यांनी आपण मुसहार जातीचे असल्याचा उल्लेख त्यावेळी जाहीरपणे केलाही होता.