मुंबई : खासगी चालकांच्या पावलावर पाऊल ठेवत एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळीत प्रथमच हंगामी भाडेवाढ केली असून यापुढेही एसटीच्या प्रवाशांना उत्सव, सणासुदीत भाडेवाढीला सोसावी लागण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन प्राधिकरणानेच याबाबतचा निर्णय एसटी महामंडळासाठी लागू केला होता आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी आता करण्यात आली आहे. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २00६ साली गृह विभागाकडून एक अधिसूचना काढण्यात आली होती. यात एसटी महामंडळास वर्षातील सर्व हंगामात केव्हाही ३३ टक्क्यांपर्यंत आणि इतर सेवांच्या बाबतीत १५ टक्क्यांपर्यंतच्या कमाल मर्यादेपर्यंत भाडे कमी करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु २0१४ मध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने याबाबत एक अजब निर्णय घेतला. यात्रा, सण, उत्सव, गर्दीचा कालावधी, मोठी सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्टी आणि साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या किंवा नंतरच्या दिवशी राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे महामंडळाला ३0 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त भाडे आकारणी तसेच कमी गर्दीच्या कालावधीत ३0 टक्क्यांपर्यंत भाडे कमी करण्याबाबतची मंजुरी दिली. याच निर्णयानुसार एसटी महामंडळाने एकूण ३0 टक्के भाडेवाढीचा मार्ग यंदाच्या दिवाळीत पत्करल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे आता यापुढील सणासुदीत, उत्सवांमध्येही भाडेवाढीचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसू शकतो. एसटी महामंडळाने दिवाळी सणानिमित्त केलेली दहा ते वीस टक्के हंगामी भाडेवाढ अत्यंत अन्यायकारक व दुर्दैवी आहे, ही भाडेवाढ मागे घ्यावी, अन्यथा मुंबईत एकही एसटी आगाराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी परिवहन मंत्री तथा एसटीचे महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना दिला. शिवसेना पक्षप्रमुख महागाई कमी करण्याची मागणी करतात व त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री रावते खास दिवाळीसाठी म्हणून प्रवाशांवर वाढीव तिकीटाचा बोजा टाकतात हे अनाकलनीय आहे, अशी टीका अहिर यांनी केली.
यापुढेही हंगामी भाडेवाढीची शक्यता
By admin | Published: November 06, 2015 2:08 AM