ठाणे : भाजपकडे सध्या कोणताही मुद्दा नसल्याने भाजपचे नेते शरद पवारांवर बोलत आहेत. बावनकुळेच नव्हे एकलाखकुळे जरी खाली उतरले, तरी पवार या सह्याद्रीच्या पहाडाला काहीही फरक पडणार नाही. त्यांच्या पायाच्या नखावरील धूळही तुम्ही उडवू शकणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.
बावनकुळे यांनी पवार यांचे बारामतीमध्ये विसर्जन करण्याची भाषा केली होती. त्यांच्या वक्तव्याचा आव्हाड यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, १९९३ ते ९५ या काळात गो. रा. खैरनार आणि भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवार यांच्यावर बेछूट आरोप केले. तेव्हा एकच लक्षात आले की, पवारांवर आरोप केला की बातमीची सोय होते. त्या पलीकडे काहीच होत नसल्याचे आव्हाड म्हणाले. भारताच्या राजकारणात उद्ध्वस्त करु, विसर्जन करू, असा शब्दप्रयोग कधीही आणि कुणीही केलेला नाही, असे शब्द वापरणाऱ्यांना त्यांचे शब्द लखलाभ होवो, असेही ते म्हणाले. जय-पराजय हा लोकशाहीचा भाग असला तरी नेत्याने काय शब्द वापरावेत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला सर्वकाही माहीत आहे. यापूर्वी पवार यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्या आरोपांचे पुढे काय झाले, हे महाराष्ट्राच्या जनतेला ज्ञात आहे. या कृत्यातून तुमच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या माणसाला तुम्ही किती घाबरतात, हेच दिसून येते.