आज पुन्हा नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:25 AM2023-12-08T11:25:34+5:302023-12-08T11:29:10+5:30

Nawab Malik: देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली.

Even today, Nawab Malik was seen sitting on the bench of the rulers in the winter session. | आज पुन्हा नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

आज पुन्हा नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.

देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही (आज) नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अजित पवार काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर बोलताना अजित पवार काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं पत्रात काय म्हटलंय?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

Web Title: Even today, Nawab Malik was seen sitting on the bench of the rulers in the winter session.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.