नाशिक : सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९० पर्यंतच्या काळात तयार झालेली ही गाणीच रसिकांचे कान तृप्त करीत असली, तरी अशीच दर्जेदार नवीन गाणीही तयार व्हायला पाहिजेत, अशी मागणी तरुणाईतून होत आहे. मानवी भाव-भावनांचे आणि समाजाचे प्रतिबिंब नेहमीच चित्रपटांमधून उमटलेले दिसून येते. पूर्वी मराठी चित्रपटांमध्ये सणासुदीची परंपरा, व्रतवैकल्ये विशेषत्वाने येत राहिली. त्यात दिवाळी सण हा नेहमीच दिग्दर्शक-निर्मात्यांना खुणावत आला आहे. वैविध्यपूर्ण विषय हाताळत मराठी चित्रपटांनी आता कात टाकली असली, तरी दिवाळी सण, परंपरा यांच्याशी मात्र काहीशी फारकत घेतलेली दिसून येते. (प्रतिनिधी)जुन्यांची ओळख दाखवली जात नाहीदिवाळी सणाचे वेध लागले की, रेडिओ-दूरचित्रवाणीवर जुनी गीते ऐकविली जातात आणि लोकांच्या ओठी रुंजी घालतात. दुर्दैवाने, या अजरामर गीतांचे गीतकार मात्र विस्मृतीत गेले आहेत. एफएम रेडिओवर जेव्हा ही गीते ऐकविली जातात, त्या वेळी गीतकारांचा ओझरता उल्लेख होतो. या गीतकारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे सौजन्य दाखविले जात नाही.सर्वाधिक ऐकविले जाणारे गाणे म्हणजे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली’. गीतकार मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले हे गीत ‘अष्टविनायक’ या चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी गायिलेले आहे. याशिवाय, पी. सावळाराम यांचे ‘बायकोचा भाऊ’ या चित्रपटातील ‘आली दिवाळी आली दिवाळी’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील बाळ कोल्हटकर यांचे ‘आली आली दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी’, दत्ता डावजेकर यांचे लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘आली दिवाळी मंगलदारी, आनंद झाला घरोघरी’, ‘तू सुखी रहा’ या चित्रपटातील गदिमा यांचे ‘दिव्या दिव्यांच्या लावून ओळी, करीन साजरी आज दिवाळी’, ‘माझा मुलगा’ या चित्रपटातील यशवंत देव यांचे ‘दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी, आमच्या घरी अन् तुमच्या घरी’, ‘ते माझे घर’ या चित्रपटातील रवींद्र भट यांचे ‘तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती’, ‘भाऊबीज’ चित्रपटातील कवी संजीव तथा कृष्णा गंगाधर दीक्षित यांचे ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती’ यासारखी दिवाळी सणावरची गीते अजरामर ठरलेली आहेत. सध्याच्या पिढीत अशी गीते कधी ऐकायला मिळणार, याचीच तरुणाईला प्रतीक्षा आहे.
...आजही जुन्या गीतांनीच उजळते दिवाळी!
By admin | Published: October 29, 2016 11:55 PM