मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये, स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. आम्ही सत्तेत आल्यास त्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे.
वंचित आदिवासी आणि ओबीसीला एका प्लॅटफॉर्मवर आणेल. आदिवासी आरक्षित मतदार संघासोबत जनरल भागात आदिवासी उमेदवार हवेत. आदिवासी फंड तीन ठिकाणी दाखवला जातो. यामुळे विधानसभेत ज्याला सत्तेत यायच आहे, त्याला आदिवासी बजेट कायदा करावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.
ट्रायबल निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविला आहे का याचा खुलासा शासनाने करावा. सरकार भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे, अटल सेतू, समृद्धी मार्ग खड्डेमय झाले आहेत. शासन भ्रष्टाचारात बुडलेले आहे. हिंसाचारावर राजकीय पक्ष का बोलत नाही? गेले 25 वर्ष जात, संवर्ग विविध मार्गाने हिंसाचार पसरवला जात आहे. आदिवासी समूह एकत्र आल्याचा आनंद आहे. ओबीसी- मराठा एकमेकांविरोधात आहेत. जरांगे यांच्या मागणीला राजकीय पक्ष उत्तर देत नाहीत. महाविकास आघाडी, महायुती यांनी स्वतंत्रपणे कोणतीही भूमिका घेतली नाही. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने विरोध तर काही ठिकाणी उघड विरोध केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
तसेच देशाचे नेतृत्व विक आहे हे 3 दिवसांत दिसेल, असेही ते म्हणाले. छगन भुजबळांनी स्वतंत्र होऊन आमच्यासोबत यावे. माझे आजही शिवसेना, राष्ट्रवादी सोबत प्रेमाचे संबंध आहेत. आघाडी झाल्यावर उमेदवारीवर निर्णय होईल, असे आंबेडकर म्हणाले.