लोणावळा: राज्यातील ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, मनसेप्रमुख राज ठाकरे, भाजप नेते चंद्रकांत पाटील, नारायण राणे यांच्यासह पंधरा राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपसह मनसेने राज्य सरकारच्या या निर्णयावर चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लोणावळा येथे आयोजित भाजप महिला आघाडी मेळाव्याला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या सुरक्षा काढणे वा ठेवणे या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेविना फिरणारे लोक आहोत. आम्हाला जी काही सुरक्षा दिली गेली आहे ती पुरेशी आहे. तसेच ती सुद्धा काढली तरी मला काहीही फरक पडणार नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील एकही सुरक्षारक्षक माझ्याबरोबर नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंचाला जायचो. सगळीकडे फिरायचो. आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे माझी काही तक्रार नाही वा आक्षेप देखील नाही.
युवा सेनेच्या वरुण देसाई यांना दिलेल्या 'एक्स' दर्जाच्या सुरक्षेवरून उपरोधिक टीकाराज्य सरकारने युवा सेनेचे सचिव असलेल्या वरुण देसाई यांना थेट 'एक्स' दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरून 'वरुण द्या, खालून द्या, ह्याला द्या, त्याला द्या. तुमच्या मनात असेल त्यांना सुरक्षा द्या,' असा उपरोधिकटीका फडणवीस यांनी ठाकरे सरकार केली आहे. तसेच आमची सुरक्षा काढून ती राज्यातील महिलांना द्यावी, हे चंद्रकांत पाटलांचे मत देखील योग्य असून तेच मला देखील वाटते. पण ठाकरे सरकारने या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी भंडाऱ्यासारख्या घटनेवर ठाकरे सरकारने अधिक लक्ष द्यावे,' अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे.
गुजराती समाजाच्या मेळाव्यावरून शिवसेनेला टोला मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना समोर ठेवून का होईना शिवसेना 'गुजराती समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आनंदाची बाब आहे. ते पण आपलेच नागरिक आहेत. मात्र, फक्त निवडणुकांच्या तोंडावर गुजराती समाजाशी सौहार्द न ठेवता त्या व्यतिरिक्त देखील त्यांच्याशी गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवले पाहिजे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे.