मुंबई - शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांची ते विचारपूस करणार आहेत. मात्र ठाकरेंच्या या दौऱ्यावर सत्ताधारी पक्षाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सत्ता गेल्यानंतरचा हा उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा आहे. ते मातोश्रीतून बाहेर पडून आपल्या लग्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगर पोहचतील. दौऱ्यानिमित्त लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा उद्धव ठाकरेंची दिसली पाहिजे याची काळजी त्यांचे फोटोग्राफर इव्हेंट करताना घेतील अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी खोचक टीका केली आहे.
उदय सामंत यांनी पत्रात म्हटलंय की, लग्झरी कारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते फोटोसेशन करतील. या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासमावेत कानात खुसफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले. शेतकऱ्यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व बडवे सोबत असतील. हे बडवे शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंच्या जवळ येणे सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या हे बडवेच उद्धव ठाकरेंना सांगतील असं सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला.
त्याचसोबत केवळ प्रसिद्धीच्या हवास्यापोटी केलेल्या लग्झरीस दौऱ्यात उद्धव ठाकरे स्वत:चा छंद जोपासून शेतकऱ्यांचे फोटो काढतील. त्यानंतर मुंबईत फोटोचे प्रदर्शन भरवून सेलेब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील. प्रदर्शन पाहतील. उद्धव ठाकरेंच्या फोटोचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील बडवे शिवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटो बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील. परंतु आदेश पाळणारे आणि बाळासाहेबांचे विचार ह्दयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाही याची सर्वांना जाणीव आहे अशी टीका सामंतांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौऱ्याचे प्रवासवर्णन केले. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारी शिवसेना व शिवसैनिक ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे बळीराजाची काळजी घ्यायला बाळासाहेबांची शिवसेना समर्थ आहे असंही मंत्री उदय सामंत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"